थकीत वीजबिल वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्याला भाजपच्या माजी नगरसेवकाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 22:05 IST2022-01-13T22:05:06+5:302022-01-13T22:05:34+5:30
Crime News: वीजबिल थकीत असल्यामुळे वीज कनेक्शन कट करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला भाजपच्या माजी नगरसेवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

थकीत वीजबिल वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्याला भाजपच्या माजी नगरसेवकाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण
पुणे - वीजबिल थकीत असल्यामुळे वीज कनेक्शन कट करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला भाजपच्या माजी नगरसेवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आंबील ओढा परिसरातील पीएमसी कॉलनीत गुरुवारी सकाळी 11 वाजता हा प्रकार घडला. धनंजय जाधव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. दत्तवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ सफल शांताराम यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नवी पेठेतील महावितरण कार्यालयात नेमणुकीस आहेत. आज सकाळी ते आपल्या काही सहकाऱ्यांसह आंबील ओढा परिसरातील सानेगुरुजी वसाहत येथे थकीत वीजबिल वसुली साठी गेले होते. वीजबिल थकीत असल्यामुळे वीज कनेक्शन कट करत असताना माजी नगरसेवक धनंजय जाधव त्या ठिकाणी आले.. आणि त्यांनी "मी लाईट बिल भरले आहे, तू मला ओळखत नाही का, मी माजी नगरसेवक आहे, तू आमच्या दारात का आला, कोणाचे घर आहे हे बघून येता येत नाही का "असे बोलून फिर्यादी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांच्या शर्टाची बटण तोडून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी धनंजय जाधव यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक कस्पटे अधिक तपास करत आहे.