पक्ष वाढवण्याचा सर्वांनाच अधिकार, एकनाथ शिंदेंनाही आहेच - अजित पवार
By राजू इनामदार | Updated: March 1, 2025 16:09 IST2025-03-01T16:08:18+5:302025-03-01T16:09:14+5:30
उद्या मी कुठल्या जिल्ह्यात गेलो तर तो जिल्हा राष्ट्रवादीचा करू असे म्हणेल, देवेंद्र फडणवीसही तसे म्हणू शकतात

पक्ष वाढवण्याचा सर्वांनाच अधिकार, एकनाथ शिंदेंनाही आहेच - अजित पवार
पुणे: पक्ष वाढवण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. आज एकनाथ शिंदे म्हणाले, पुणे जिल्हा भगवा करू. उद्या मी कुठल्या जिल्ह्यात गेलो तर तो जिल्हा राष्ट्रवादीचा करू असे म्हणेल. देवेंद्र फडणवीसही तसे म्हणू शकतात तुम्ही काहीही केले तरी, कितीही उलटसुलट प्रश्न विचारले तरीही आम्ही एकत्र राहण्याचे ठरवले आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
औंध मध्ये एका रुग्णालयाच्या कार्यक्रमासाठी आले असताना पवार यांना पत्रकारांनी, एकनाथ शिंदे पुणे जिल्हा भगवा करू असे म्हटल्याचे सांगितले. त्यावर उत्तर देताना पवार यांनी कोणतीही टीका न करता पक्ष वाढवण्याचा अधिकार सर्वांनाच आहे असे सांगितले. तुम्ही लावालाव्या करायचे बंद करा, कोणाच्या हातात सुत्रे द्यायची हे जनतेच्या हातात आहे असे त्यांनी पत्रकारांनाच बजावले.
माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्यांच्या कार्यकाळात दिलेल्या काही निविदा रद्द करण्यात आल्याचे मला समजले. मात्र त्याची सविस्तर माहिती नाही. ती घेतल्यानंतरच यावर बोलू असे ते म्हणाले. एखादा गुन्हा घडल्यानंतर माध्यमे घाई करतात. पोलिसांचा तपास तक्रार झाल्यानंतर सुरू होतो. गुन्हेगाराला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होतो. अशा घटना घडूच नयेत हे बरोबर आहे, मात्र झाल्यात तर त्याचा तपासही तातडीने लागावा हे राज्यकर्त्यांसहित सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे असे मत पवार यांनी व्यक्त केले.
स्वारगेट मधील प्रकरणात तोडफोड करण्यात आली हेही चुकीचे आहे. स्वत:ला वेगळे दाखवण्याचा काहीजणांचा प्रयत्न असतो. सार्वजनिक मालमत्तेचे कोणी नुकसान करत असेल तर त्याचा खर्च संबधितांकडून वसूल करावा असा न्यायालयाचा निर्णय आहे. मुख्य गुन्ह्याचा तपास झाल्यावर याही प्रकरणात पोलिस योग्य ती कायदेशीर कारवाई करतील असे पवार म्हणाले. पीएमपीएलमध्ये आगार व्यवस्थापक महिला कर्मचाऱ्यांना त्रास देतो याची माहिती घेतली. पीएमपीएलच्या आयुक्तांबरोबर बोललो आहे. त्यांना सुचना दिल्यात. कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती पवार यांनी दिली. अर्थसंकल्प लवकरच सादर करणार आहोत. आता पुरवणी मागण्या मांडल्या जातील. केंद्र सरकारने त्यांच्या अंदाजपत्रकात समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हीही त्याप्रमाणेच सर्व घटकांचा विचार करून त्यांच्यासाठी काही करू असे पवार म्हणाले.