राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 18:08 IST2025-11-10T18:06:01+5:302025-11-10T18:08:16+5:30
Rupali Thombre Patil: रुपाली ठोंबरे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवक्तेपदावरून हटवले. पण, ठोंबरे पाटील अजूनही प्रवक्ता असल्याचे सांगत आहेत.

राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
Rupali Thombre Patil Ajit Pawar: रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्यात पुन्हा संघर्ष उफाळून आला. रुपाली ठोंबरे पाटलांनी थेट अजित पवारांकडे धाव घेतली. रुपाली चाकणकर यांनीही चर्चा केली. रुपाली ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या नोटीसला उत्तर देण्यापूर्वीच त्यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली. पक्षाने प्रवक्ते पदावरून हटवले असले, तर रुपाली ठोंबरे पाटील स्वतःला पक्षाचे प्रवक्ते असल्याचे म्हणत आहेत. एक पोस्ट करत त्यांनी पक्षाने घेतलेल्या निर्णयावर भूमिका मांडली आहे.
रुपाली ठोंबरे पाटील अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यापासून अधूनमधून त्यांचे रुपाली चाकणकरांसोबत खटके उडत आहेत. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणानंतर रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यातील वाद शिगेला पोहोचला.
त्याच पुण्यातील एका महिलेने रुपाली ठोंबरे यांच्यावर माणसे पाठवून मारहाण केल्याचा आरोप केला. हे रुपाली चाकणकरांनी केल्याचा आरोप ठोंबरे पाटलांनी केला. दोन्ही महिला नेत्यांमधील वाद डोकेदुखी ठरत असतानाच पक्षाने एक निर्णय घेतला. पक्षाने नव्याने प्रवक्त्यांची नियुक्ती केली. त्यातून रुपाली ठोंबरे पाटलांना वगळण्यात आले.
रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, अजित पवारांना भेटणार
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवक्ते पदावरून दूर केले असले, तरी रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रवक्ते असल्याचे उल्लेख केला आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रवक्त्यांची नवीन यादी जाहीर झाल्यानंतर एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या शेवटी 'रुपाली पाटील ठोंबरे. माजी नगरसेविका. 'प्रवक्त्या' राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, असा उल्लेख केला आहे.
या पोस्टमध्ये रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे की, 'नमस्कार जय महाराष्ट्र, मी आज पुण्याच्या बाहेर आहे. प्रवासात असल्याने माझा संपर्क होऊ शकला नाही. आज पक्षाने नव्याने प्रवक्त्यांची नेमणूक केली आहे. त्यात माझ्यासह आमदार अमोल मिटकरी, वैशाली नागवडे यांची नावे नाहीत. आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरे जाण्यास सज्ज आहोत. पक्षाचे काम जोमाने करणार आहोत. या यादीबद्दल अजितदादांना भेटून, बोलून या विषयी माहिती घेईल; मग आपल्या सर्वांशी सविस्तर बोलेन.'
चाकणकरांसोबतचा वाद भोवला?
महिला आयोगाच्या अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर यांच्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील यांचा संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यापासून अनेकवेळा दोन्ही महिला नेत्यांमध्ये राजकीय वाद झाला आहे.
आता फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केले होते. रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोगाच्या राजीनाम्याचा विषयही त्यांनी काढला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर पक्षाने रुपाली ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर प्रवक्ते पदावरून बाजूला केलं. पक्षाच्या या निर्णयानंतर चाकणकरांसोबतचा वाद रुपाली ठोंबरे पाटील यांना भोवल्याची चर्चा सुरू आहे.