दहा वर्षांनंतरही काम अपूर्णच; पाणीपट्टी मात्र केली दुप्पट..!
By राजू हिंगे | Updated: April 1, 2026 10:58 IST2026-04-01T10:54:52+5:302026-04-01T10:58:28+5:30
- आतापर्यंत १ हजार ५५७ कोटींचा खर्च, ८५ टक्के कामे पूर्ण; ८२ पैकी १५ टाक्यांचे काम अद्यापही बाकी

दहा वर्षांनंतरही काम अपूर्णच; पाणीपट्टी मात्र केली दुप्पट..!
पुणे : शहरातील पाणीगळती रोखणे आणि समान पाणी वाटप करण्याच्या उद्देशाने समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाला २०१६ मध्ये सुरुवात झाली. या योजनेच्या कामाला मंजुरी देताना पहिल्याच वर्षी पाणीपट्टीमध्ये २० टक्के वाढ करण्यात आली, तर पुढील चार वर्षे पाणीपट्टीत प्रतिवर्ष तब्बल १५ टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने टप्प्याटप्प्याने पाणीपट्टीत आतापर्यंत तब्बल ८० टक्के वाढ केलेली आहे. परंतु आज १० वर्षांनंतरही या योजनचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे समान पाणीपुरवठाच्या नावाखाली पुणेकरांना अतिरिक्त पाणीपट्टीचा भार सोसावा लागत आहे.
यामुळे एकीकडे या योजनचे काम अपूर्ण असतानाच पाणीपट्टीची वसुली मात्र पूर्ण होत असल्याचे चित्र आहे. समान पाणीपुरवठा योजनेसाठी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने २०१५ च्या मे महिन्यात मान्यता दिली होती. त्यानंतर या योजनेची निविदा प्रक्रिया वादात सापडली. यामुळे फेरनिविदा मागविण्यात आल्या होत्या.
यामधून पुणे महापालिकेचे सुमारे १ हजार कोटी रुपये वाचले आहेत. त्यानंतर या योजनेचे काम सुरू झाले. २ हजार ८१८ कोटींच्या योजनेच्या कामाला २०१६ मध्ये सुरुवात झाली आहे. शहरातील बहुचर्चित समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाला मंजुरी देताना पहिल्याच वर्षी पाणीपट्टीमध्ये २० टक्के वाढ करण्यात आली, तर पुढील चार वर्षे पाणीपट्टीत प्रतिवर्ष १५ टक्के अशी वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने टप्प्याने पाणीपट्टीत वाढ केली आहे. तसेच ही योजना पूर्ण झाल्यानंतर मानकापेक्षा अधिक पाण्याच्या वापरावर मीटरनुसार बिल आकारणी करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शहरात उभारण्यात येणाऱ्या ८२ पैकी १५ टाक्यांचे काम अद्यापही अपूर्ण आहे.
दरम्यान, कोरोना काळात या योजनेचे काम ठप्प होते. त्यानंतर वाहतूक पोलिस, पाटबंधारे विभाग, रेल्वे, लष्कर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या परवानगीमुळेही कामाला उशीर झाला आहे. या योजनेसाठी आतापर्यंत १ हजार ५५७ कोटी रुपये खर्च झाला आहे. या योजचेने काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. या योजनचे काम पूर्ण होण्यासाठी १४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. ही योजना पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतर पाण्याची गळती २० टक्के कमी होणार आहे. त्यामुळे ३ ते ४ टीएमसी पाण्याची बचत होणार आहे.
२०० कोटींच्या कर्जरोख्यावर पालिकेने भरले १२९ कोटींचे व्याज
शहरातील बहुचचित समान पाणीपुरवठा योजनेसाठी २०० कोटी रुपयांचे कर्जरोखे पालिकेने २०१७ साली साडेसात टक्के व्याजदराने घेतले आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी समान पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोख्यांची कल्पना मांडली होती. त्या वेळी कर्जरोखे काढणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली होती. विशेष म्हणजे ज्या दिवशी कर्जरोखे घेण्याचा निर्णय घेतला त्या दिवशीही पालिकेच्या विविध बँकामध्ये सुमारे १ हजार कोटींच्या ठेवी होत्या. या कर्जापोटी पालिका दरवर्षी १५ कोटी १८ लाखाचे व्याज भरत आहे. पालिकेने कर्ज रोखे अधिक व्याजदराने आणि ठेवी त्यापेक्षा कमी व्याजदराने ठेवल्या आहेत. पालिकेने या कर्जरोख्यावर आतापर्यंत १२९ कोटी ५ लाख व्याज दिले आहे. त्यामुळे पालिकेचा तोटा झाला आहे.
समान पाणीपुरवठा योजनेच्या कामांची आकडेवारी
नियोजित कामे पूर्ण कामे अपूर्ण कामे
पाण्याचा टाक्या ८२ ६७ टाक्यांची कामे १५ टाक्यांची कामे
दाबनलिका १०३ कि.मी. ९८ किमी कामे ४.७ किमी कामे
जलवाहिनी ११५८ कि.मी. १०२९ किमी १२९ किमी कामे
पाणीमीटर २,३८,५९५ १,९७,८६९ ४०,७२६
पंपिंग स्टेशन ३ पर्वती जलकेंद्र, संतोषनगर कात्रज वंडरसिटी येथील कामे सुरू
---
४ टीएमसी पाणीबचत..!
आतापर्यंत १ हजार ५५७ कोटी रुपये खर्च झाला आहे. या योजचेने काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. या योजनचे काम पूर्ण होण्यासाठी १४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. ही योजना पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतर पाण्याची गळती २० टक्के कमी होणार आहे. त्यामुळे ३ ते ४ टीएमसी पाण्याची बचत होईल.
कर्जरोख्यावर पालिकेने भरले १२९ कोटींचे व्याज
समान पाणीपुरवठा योजनेसाठी २०० कोटी रुपयांचे कर्जरोखे पालिकेने २०१७ साली साडेसात टक्के व्याजदराने घेतले आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी समान पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोख्यांची कल्पना मांडली होती. विशेष म्हणजे ज्या दिवशी कर्जरोखे घेण्याचा निर्णय घेतला त्या दिवशीही पालिकेच्या विविध बँकामध्ये सुमारे १ हजार कोटींच्या ठेवी होत्या. या कर्जापोटी पालिका दरवर्षी १५ कोटी १८ लाखाचे व्याज भरत आहे. पालिकेने कर्ज रोखे अधिक व्याजदराने आणि ठेवी त्यापेक्षा कमी व्याजदराने ठेवल्या आहेत. पालिकेने या कर्जरोख्यावर आतापर्यंत १२९ कोटी ५ लाख व्याज दिले आहे.
सम्मान पाणीपुरवठा योजनेचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ही योजना कार्यान्वित होईल. त्यानंतर शहाराच्या जुन्या हद्दीमध्ये पाण्याचे समान वाटप होऊन टप्प्याटप्प्याने पाणीगळती कमी होईल. - नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागप्रमुख, पुणे महापालिका