दूरचित्रवाहिन्यांच्या गजबजाटात अवतरले ‘दूरदर्शन’चे युग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 01:38 PM2020-04-03T13:38:04+5:302020-04-03T13:46:09+5:30

 ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘भारत एक खोज’, ‘व्योमकेश बक्षी’ अशा दर्जेदार मालिकांचा खजिना

The era of 'Doordarshan' is once again coming in channels crowd | दूरचित्रवाहिन्यांच्या गजबजाटात अवतरले ‘दूरदर्शन’चे युग

दूरचित्रवाहिन्यांच्या गजबजाटात अवतरले ‘दूरदर्शन’चे युग

googlenewsNext
ठळक मुद्दे९०च्या दशकातील प्रेक्षक स्मरणरंजनात रमले

नम्रता फडणीस- 
पुणे : दूरचित्रवाहिन्यांच्या गजबजाटात आता पुन्हा एकदा ‘दूरदर्शन’चे युग अवतरले आहे. सध्याच्या कोरोना काळात ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘भारत एक खोज’, ‘व्योमकेश बक्षी’ अशा दूरदर्शनवरच्या दर्जेदार मालिकांचा खजिना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने खुला केल्यामुळे ९०च्या दशकातील प्रेक्षक स्मरणरंजनात रमले आहेत.
दूरचित्रवाहिन्यांवरून सर्वांचीच नजर आता ‘दूरदर्शन’कडे वळली आहे. आजच्या काळात विविध दूरचित्रवाहिन्यांनी मनोरंजन क्षेत्रावर आपले वर्चस्व निर्माण केले असले तरी एक काळ असा होता, की दूरदर्शनने प्रेक्षकांच्या सामाजिक अवकाशावर प्रभुत्व मिळविले होते. १५ सप्टेंबर १९५९ साली भारतात ‘दूरदर्शन’ अस्तित्वात आले. भारतीय माध्यमातील इलेक्ट्रॉनिक युगाला दूरदर्शनमुळे प्रारंभ झाला.  ‘रामायण’, ‘महाभारत’ अशा पौराणिक मालिकांनी प्रेक्षकांचे अवघे जग व्यापून टाकले.  
‘रामायण’ लागले, की रस्त्यावर शुकशुकाट होत असल्याच्या आठवणी आजही अभिमानाने सांगितल्या जातात. दूरदर्शनवर प्रसारित होणाºया ‘बुनियाद’, ‘किले का रहस्य’, ‘उडान’ यासारख्या दर्जेदार मालिकांमुळे प्रेक्षक वर्ग आपोआपच निर्माण होत गेला. मात्र, ९०च्या दशकानंतर जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर खासगी वाहिन्यांनी मनोरंजन क्षेत्रात शिरकाव केला आणि त्यानंतर हळूहळू दूरदर्शनकडे लोकांनी पाठ फिरविण्यास सुरुवात केली. मात्र, सध्याच्या कोरोना काळात ‘होम क्वारंटाईन’ झालेल्या मंडळींसाठी दूरदर्शनच्या खजिन्यातील अभिजात मालिकांचा नजराणा प्रेक्षकांसमोर खुला झाल्याने साठी-सत्तरीच्या दशकातील प्रेक्षक  ‘नॉस्टेल्जिक ’ झाले आहेत.
सोशल मीडियावर अनेक जण आनंद व्यक्त करणाºया पोस्ट शेअर करीत आहेत. नवीन पिढीदेखील या मालिकांचा आनंद घेत आहे. या सुवर्णकाळाविषयी ‘मुंबई दूरदर्शन’चे माजी निर्माते अरुण काकतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘‘आम्ही दूरदर्शनवर ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ हा कार्यक्रम करायचो. विविध क्षेत्रांमधील मान्यवर व्यक्तींशी संवाद साधला जायचा. ‘शब्दांच्या पलीकडे’ कार्यक्रमात आम्ही पं. जितेंद्र अभिषेकी यांचा कार्यक्रम करणार होतो; पण दिल्लीचे ट्रान्समिशन लांबले आणि पंडितजींचा कार्यक्रम सुरू होण्यास विलंब लागला. दहाचा कार्यक्रम म्हणून ते नऊ वाजता येऊन बसले. कार्यक्रम ११ वाजता सुरू झाला; पण पंडितजी काही बोलले नाहीत.’’
..........
मंत्र, यंत्र आणि तंत्र ही त्रिसूत्री महत्त्वाची
दूरदर्शनवर पहिल्यांदा ‘महाश्वेता’ कार्यक्रम सादर झाला होता. आमचे केशव केळकर एक निर्माते होते. तेव्हा ते नेहमी सांगायचे. मंत्र, यंत्र आणि तंत्र ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. कटेंट चांगला असेल तर यंत्र आणि तंत्र त्याला मदत करतात. जे कार्यक्रम सर्व कुटुंब एकत्र बसून लाभ घेऊ शकतील, असे असले पाहिजेत. निवेदक यादेखील घरच्या वाटल्या पाहिजेत. कार्यक्रम लोक बाहेर जाऊन बघतील ते दाखवायचे नाही, असे आम्हाला सांगितले जायचे. आताच्या पिढीला दूरदर्शनचे तंत्रज्ञान कदाचित जुने वाटू शकेल; पण मालिकांचा दर्जा हा उत्कृष्ट होता. सेलिब्रिटी म्हणून कुणाच्याही डोक्यात हवा गेलेली नव्हती. सगळ्यांसाठी हे माध्यम नवीन होते. आम्ही निर्मित केलेल्या कार्यक्रमांचेही पुन:प्रक्षेपण व्हायला हवे.

Web Title: The era of 'Doordarshan' is once again coming in channels crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.