Jejuri: भारतीय वेशभूषा असेल तरच प्रवेश मिळणार; जेजुरी खंडोबा मंदिराचा महत्वपूर्ण निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:38 IST2025-03-10T15:37:21+5:302025-03-10T15:38:42+5:30
Jejuri Khandoba Mandir Dress Code: मंदिराची पावित्र्य, शालीनता जपणारी वेशभूषा अपेक्षित असून गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड- कमी कपडे अपेक्षित नाहीत

Jejuri: भारतीय वेशभूषा असेल तरच प्रवेश मिळणार; जेजुरी खंडोबा मंदिराचा महत्वपूर्ण निर्णय
जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून वस्त्र संहिता (Dress Code) लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असून तसेच त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे.
यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. पुरूष व महिला भाविकांना मंदिरांत कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आले आहे.
फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बर्मुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. याविषयी बोलताना श्री मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त श्री. अभिजीत देवकाते म्हणाले की, "मंदिराची पावित्र्य, शालीनता जपणारी वेशभूषा भाविकांकडून अपेक्षित आहे. गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड- कमी कपडे अपेक्षित नाहीत. असे कपडे न घालण्याचं नम्र आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे. महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत. दरम्यान दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारचे भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे.
याचबरोबर देवस्थानच्या भंडारा प्रसाद निर्मिती केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे. हा भंडारा प्रसाद भाविक भक्तांनी देवाला मनोभावे अर्पण केलेल्या भंडाऱ्यापासून तयार करण्यात येणार आहे. खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना निःशुल्क हा " भंडार प्रसाद " देण्यात येणार आहे. भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. देवाच्या अंगावर पडणारा भंडारा एकत्र करून त्याच्या पिशव्यामधून भाविकांना देण्यासाठी पुणे येथील खंडोबा भक्त विलास दशरथ बालवडकर यांनी सुमारे एक लाख रुपये खर्चाची यंत्रसामुग्री देवसंस्थानला दिली आहे.