Entry to PMP in Railway Yard | ‘पीएमपी’ला रेल्वे आवारात ‘एन्ट्री’
‘पीएमपी’ला रेल्वे आवारात ‘एन्ट्री’

ठळक मुद्देपुणे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. अनेक प्रवासी शहरात इच्छित ठिकाणी जाण्यासाठी करतात पीएमपी बस, रिक्षा किंवा कॅबचा वापर

पुणे : पुणेरेल्वे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या बसला आवारात ‘एन्ट्री’ देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या प्रवाशांना ने-आण करणाऱ्या वाहनांसाठी असलेल्या लेनमधून या बस धावतील. या लेनमध्येच पीएमपीचा स्वतंत्र बसथांबा दिला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेच्या आवारातूनच बस पकडता येणार आहे. 
रेल्वे आवारात सध्या कॅब व रिक्षांसाठी स्वतंत्र थांबा आहे. त्यासाठी त्यांना स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. तर, प्रवाशांची ने-आण करणाऱ्या खासगी वाहनांसाठी स्वतंत्र लेन आहे. या लेनमध्ये खासगी वाहनांना फार काळ थांबता येत नाही. वाहतूककोंडी टाळण्यासाठी स्थानकाबाहेर सब-वेच्या पुलावरून एक रस्ता थेट रेल्वे आवारात काढण्यात आला आहे. तसेच, पूर्वीचे प्रवेशद्वारही नुकतेच बंद करण्यात आले आहे. पुणे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. त्यापैकी अनेक प्रवासी शहरात इच्छित ठिकाणी जाण्यासाठी पीएमपी बस, रिक्षा किंवा कॅबचा वापर करतात. रिक्षा व कॅब आवारातच उपलब्ध होते; 
पण बससाठी मुख्य रस्ता ओलांडून किंवा सब-वेमधून काही अंतर पार करावे लागते. प्रवाशांकडे अधिक सामान, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक असल्यास ते लांब चालत जाण्याचे टाळत रिक्षा किंवा कॅबचा आधार घेतात. त्यामुळे पीएमपीपासून हे प्रवासी दूर जात होते. आता अशा प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे व पीएमपी प्रशासनाच्या समन्वयातून पीएमपीला रेल्वे आवारात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवारी (दि. १८) बसची रेल्वे आवारातील लेनमधून चाचणी घेण्यात आली. आता मंगळवारपासून या लेनमधून नियमितपणे बस धावतील. पण, काही ठराविक मार्गांवरील बसच या लेनमधून जाणार आहेत. त्यामध्ये कात्रज, कोथरूड, निगडी, आळंदी, वाघोली, तळेगाव, हडपसर आदी ठिकाणांचा समावेश आहे. या भागात जाणाºया प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.
............
प्रवाशांना रेल्वे स्थानकाच्या आवारातूनच बस उपलब्ध होणार असल्याने त्यांची सोय होणार आहे. याठिकाणी बससाठी स्वतंत्र थांबाही असेल. रेल्वे स्थानकातून ये-जा करणारे अनेक प्रवासी बसचा वापर करतात. प्रवाशांमध्ये वाढ होण्यासाठी पीएमपीला त्याचा फायदा होईल. - नयना गुंडे, अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

Web Title: Entry to PMP in Railway Yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.