Entrance Exam After 12th: पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या परीक्षेच्या तारखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 11:50 IST2022-06-24T11:48:39+5:302022-06-24T11:50:06+5:30
बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर राज्यातील अनेक विद्यापीठांमार्फत विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येते

Entrance Exam After 12th: पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या परीक्षेच्या तारखा
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा २१ ते २४ जुलैदरम्यान होणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर राज्यातील अनेक विद्यापीठांमार्फत विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येते. त्यानुसार पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ जूनपासून सुरू झाली आहे, तर १७ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येऊ शकतात. त्याची पडताळणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आणि प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध होईल.
विद्यापीठात नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या पाच वर्षांत अनेक नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केले आहेत. प्रवेशासाठी पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अडीच हजार जागा उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांचे शुल्क इतर खासगी विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या तुलनेत खूप कमी आहे. तसेच शिक्षणही दर्जेदार असते. त्यामुळे या प्रवेशप्रक्रियेत देशभरातून दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी अर्ज करतात. गेल्यावर्षी या प्रवेशप्रक्रियेत या जागांसाठी ३० हजारांपेक्षा अधिक अर्ज आले होते.
अशी हाेणार परीक्षा
- विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये १६ पदवी अभ्यासक्रम सुरू
- त्यासाठीची परीक्षा २१ जुलै रोजी
- २२ ते २४ जुलैदरम्यान पदव्युत्तर आणि इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा विविध सत्रांमध्ये ऑनलाइन होणार