कात्रज घाटात किळसवाणा प्रकार; नग्न प्रवाशाकडून रिक्षाचालक महिलेचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 14:24 IST2022-12-30T13:01:56+5:302022-12-30T14:24:43+5:30
अंगावरील सर्व कपडे काढून प्रवाशाने कात्रज घाटात नग्न अवस्थेत रिक्षाचालक महिलेचा पाठलाग केला

कात्रज घाटात किळसवाणा प्रकार; नग्न प्रवाशाकडून रिक्षाचालक महिलेचा विनयभंग
पुणे/किरण शिंदे : प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या एका व्यक्तीने रिक्षा चालक महिलेसोबत किळसवाणे कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कात्रज घाटात या व्यक्तीने रिक्षा घेऊन जाण्यास भाग पाडले आणि रिक्षा चालक महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. रिक्षा चालक महिलेने याला नकार दिल्यानंतर अंगावरील सर्व कपडे काढून या महिलेचा पाठलाग केला. 26 डिसेंबरच्या रात्री आठ वाजता कात्रज घाटात हा सर्व प्रकार घडला.
याप्रकरणी निखिल अशोक मेमजादे (वय 30, रा. शंकर मठ हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. एका 38 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या रिक्षा चालवून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. 26 डिसेंबरच्या रात्री त्या रिक्षा चालवत असताना आरोपी त्यांच्या रिक्षात प्रवासी म्हणून बसला. कात्रज घाटात जायचे असल्याचे सांगून त्याने तिकडे रिक्षा नेण्यास भाग पाडले. दरम्यान रात्री दहा वाजताच्या सुमारास कात्रज घाटातील अंधारातून रिक्षात जात असताना एका लॉजिंगच्या बोर्डजवळ त्याने रिक्षा थांबण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपी फिर्यादी महिलेला जेवणासाठी बळजबरी करू लागला. फिर्यादी महिलेने त्याला नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्या गालात चापट मारली आणि शारीरिक संबंधाची मागणी करू लागला.
"मला तुझ्या सोबत इथेच शारीरिक संबंध करायचे आहेत, या अंधारात तुझ्या मदतीला कोणीही येणार नाही तुला काय करायचे ते कर" असे बोलून आरोपीने अंगावरील सर्व कपडे काढले आणि फिर्यादीच्या शेजारी बसला. या सर्व प्रकारामुळे फिर्यादी घाबरल्या आणि त्या रिक्षातून खाली उतरून पळू लागल्या. त्यानंतर आरोपीनेही नग्न अवस्थेत कात्रज घाटात फिर्यादींचा पाठलाग केला. या सर्व प्रकाराने घाबरलेल्या फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.