पुण्यात ‘आरएमसी’विरोधात एल्गार, मग पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक गप्प का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 18:16 IST2026-04-09T18:15:01+5:302026-04-09T18:16:10+5:30

- राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहराचा ठपका कधी पुसून काढणार? : बेकायदेशीर प्लांटची संख्या मोठी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

Elgar against 'RMC' in Pune, then why are the corporators of Pimpri-Chinchwad silent? | पुण्यात ‘आरएमसी’विरोधात एल्गार, मग पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक गप्प का?

पुण्यात ‘आरएमसी’विरोधात एल्गार, मग पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक गप्प का?

पिंपरी :पुणे महापालिकेतील नगरसेवकांनी शहरातील रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांट शहराबाहेर हलवण्यासाठी आणि अवैध प्रकल्प बंद करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील हवेच्या प्रदूषणात आरएमसी प्लांटचा मोठा वाटा असूनही, येथील लोकप्रतिनिधी ठोस भूमिका कधी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरएमसी प्लांटमधून निघणारी सिमेंटची सूक्ष्म धूळ फुप्फुसासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे दमा, ब्रॉन्कायटिस आणि त्वचेचे आजार वाढत आहेत. जर वेळेत हे प्लांट नागरी वस्तीपासून लांब हलवले नाहीत, तर पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते. 

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रदूषणाचे ‘हॉट स्पॉट’

वाकड-हिंजवडीसारख्या आयटी पार्कजवळ असलेल्या बांधकामांच्या वाढत्या संख्येमुळे तेथे हवेतील प्रदूषणाने उच्चांक गाठला जातो. चिखली, मोशी, भोसरी आणि दिघी या भागातही गृहप्रकल्पांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने आरएमसी प्लांटची संख्या मोठी आहे. नागरी वस्तीजवळ असलेल्या प्लांटमुळे रात्रीच्या वेळीही धुळीचे लोट हवेत तरंगताना दिसतात. शहरातील या भागांत आरएमसी प्लांटची संख्या अधिक असून तिथे प्रदूषणाची पातळी अनेक वेळा धोक्याच्या पातळीच्या पलीकडे जाते.

नियमावली कागदावरच; दुर्लक्ष कशासाठी?

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार, आरएमसी प्लांटभोवती उंच पत्रे लावणे, पाण्याचा फवारा मारणे आणि धूळ रोखण्यासाठी यंत्रणा बसवणे बंधनकारक आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील बहुतांश प्लांटमध्ये या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. ‘लोकमत’ने यापूर्वीही याबाबतीत वारंवार आवाज उठवला आहे. मध्यंतरी पिंपरी-चिंचवड राज्यातील सर्वात प्रदूषित शहर ठरले होते, त्याला हे अनियंत्रित आरएमसी प्लांटच जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पुण्याच्या पावलावर पाऊल टाकणार का?

पुणे महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी आरएमसी प्लांट शहराबाहेर हलविण्याची मागणी लावून धरली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक आणि राजकीय नेत्यांनी या गंभीर विषयावर अद्याप आक्रमक भूमिका घेतलेली नाही. पुण्याचे नगरसेवक जर रहिवाशांच्या आरोग्यासाठी एकत्र येऊ शकतात, तर आमच्या शहरातील नेते गप्प का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या

निवासी क्षेत्रातील सर्व आरएमसी प्लांट त्वरित शहराबाहेर हलवावेत.

विनापरवाना चालणारे अवैध प्रकल्प सील करावेत.

हवेच्या गुणवत्तेची सध्याची माहिती देणारे फलक संबंधित प्लांटबाहेर लावणे सक्तीचे करावे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्लांटवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. 

शेजारील पुणे महापालिकेत जर असा निर्णय होत असेल तर आपल्या महापालिकेतही पिंपरी-चिंचवडकरांच्या आरोग्यासाठी सर्व नगरसेवकांनी आरएमसी प्लांट व प्रदूषणाच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली पाहिजे, अशी सामान्य नागरिकांची भावना आहे.  - मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते.

Web Title : प्रदूषण पर चुप्पी: पिंपरी-चिंचवड में आरएमसी संयंत्रों पर सवाल।

Web Summary : पुणे में आरएमसी संयंत्रों का विरोध। पिंपरी-चिंचवड के निवासी रिहायशी इलाकों के पास प्रदूषणकारी संयंत्रों के खिलाफ कार्रवाई की मांग करते हैं। स्वास्थ्य जोखिम और नियामक उल्लंघन सार्वजनिक क्रोध को बढ़ावा देते हैं, बढ़ते प्रदूषण के बावजूद स्थानीय नेताओं की निष्क्रियता पर सवाल उठाते हैं।

Web Title : Pimpri-Chinchwad residents question silence on RMC plants amid pollution concerns.

Web Summary : Pune activists protest RMC plants. Pimpri-Chinchwad residents demand action against polluting plants near residential areas. Health risks and regulatory violations fuel public anger, questioning local leaders' inaction despite rising pollution levels.