वीज वितरण कंपनीकडून पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा बंद; मुळशीत २१ गावांमध्ये पाणी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:35 IST2025-01-21T10:34:07+5:302025-01-21T10:35:38+5:30
५० लाखांच्या थकबाकीने वीज पुरवठा बंद झाल्याने पाणीपुरवठा विभागाचे पंप बंद झाले असून, तब्बल २१ गावांचा पाणीपुरवठा थांबला आहे

वीज वितरण कंपनीकडून पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा बंद; मुळशीत २१ गावांमध्ये पाणी नाही
घोटवडे : मुळशी तालुक्यातील तब्बल २१ गावांनी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची पाणीपट्टीच भरली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाची तिजोरी इतकी रिकामी झाली की त्यांच्याकडे विजेचे बिल देण्यासाठीही पैसे शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे मुळशी तालुक्यातील तब्बल ४९ लाख ९३ हजार ८२८ रुपयांची वीज बिलाची थकबाकी झाली आहे. परिणामी वीज वितरण कंपनीने प्रादेशिक पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा बंद केला आहे. वीज पुरवठा बंद झाल्याने पाणीपुरवठा विभागाचे पंप बंद झाले असून, तब्बल २१ गावांचा पाणीपुरवठा थांबला आहे.
याबाबत माहिती अशी की, मुळशी तालुक्यातील माले ते पिरंगुटपर्यंतच्या २१ गावांचा पाणीपुरवठा हा मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून केला जातो. त्याची पाणीपट्टी ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा विभागाकडे भरणे अपेक्षित आहे. मात्र, ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरली नाही. त्यामुळे २१ गावांकडून पाणीपुरवठा विभागाला तब्बल दोन कोटी ४ लाख ३१ हजार ५३१ रुपये बिल येणे बाकी राहिली आहे. त्यामुळे मुळशी प्रादेशिक विभागाला त्यांचे वीज बिल भरण्यासाठी देखील पैसे शिल्लक राहिले नाहीत. पाणीपुरवठा विभागाचे वीज बिलही तब्बल ४९ लाख ९८ हजार ८२८ इतके थकीत राहिले आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने पाणीपुरवठा विभागाला अनेकवेळा नोटिसा बजावल्या व अखेर वीजपुरवठा खंडित केला आहे. सर्व ग्रामपंचायतींनी खातेदारांना पाणीपट्टी भरण्यासाठी दवंडी व लेखी सूचना दिल्या. खातेदारांना पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले. मात्र, नागरिकांकडून पाणीपट्टी भरली जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा भरण्यासाठी निधी नाही.
तब्बल २१ गावांकडून पाणीपट्टीपोटी दोन कोटींपेक्षा रक्कम थकीत आहे. त्यामुळे योजना चालविणे कठीण होते. योजना कार्यान्वित करताना वीज बिल, पंप आणि यंत्रसामुग्रीची देखरेख आदी मोठे खर्च असतात. जोपर्यंत पाणीपट्टीतून ही रक्कम आपल्याकडे येत नाही तोपर्यंत हा खर्च करायचा कसा, असा प्रश्न असतो.
मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकडून सुमारे ५० लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना नोटीस पाठवूनही बिल भरले जात नाही, त्यामुळे नाईलाजास्तव वीजपुरवठा कापावा लागला.- आनंद घुले, उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी
थकीत गावांची माहिती अशी
माले - ७0,५00,
संभवे - ३५,३८0,
जामगाव (दिसली )- १,४५,३५४,
अकोले -१,३१,४१३,
कोंढावळे (कळमशेत )- १०,३३,७२0,
पौड (विट्ठलवाडी )- ३२,२७,१३२,
भादस (शिळेश्वर )- १२,९४,३४४,
आसदे -१00३५७,
खबवली -७,0८५३४
रावडे (हुलवळेवाडी )-१७,२00/
दखने- ४२,२00/-
चाले (सावरगाव )-१,४२,५४८/-
दारवली -१८,२५,९३९/-
मुगावडे -१,0१,२0१/-
अंबडवेट -३,४७,0२0/-
भरे -६९,४00/-
पिरंगुट -५७,६६,३३२/-
शेरे -१६,८00
कासारआंबोली- ७,८८,८४४
घोटावडे- ३५,७५,९८३
मूलखेड- १५,८८0
एकूण थकबाकी रू. २,0५,३३,५८१