Municipal Elections: अंतिम प्रभाग रचनेला निवडणूक आयाेगाची मान्यता; येत्या सोमवारपर्यंत गॅझेट प्रसिद्ध करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 11:03 IST2025-10-04T11:02:12+5:302025-10-04T11:03:22+5:30
अंतिम प्रभाग रचनेचे गॅझेट येत्या सोमवारपर्यंत प्रसिद्ध केले जाणार असून प्रारूप प्रभाग रचनेत किती बदल झाले या विषयीची उत्सुकता इच्छुकांना लागली आहे

Municipal Elections: अंतिम प्रभाग रचनेला निवडणूक आयाेगाची मान्यता; येत्या सोमवारपर्यंत गॅझेट प्रसिद्ध करणार
पुणे: पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशींसह अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेकडे पाठविली आहे. अंतिम प्रभाग रचनेचे गॅझेट येत्या सोमवारपर्यंत प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामुळे प्रारूप प्रभाग रचनेत किती बदल झाले या विषयीची उत्सुकता इच्छुकांना लागली आहे.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेवर मागविलेल्या हरकती सूचनांवर सुनावणी होऊन ही प्रारूप प्रभाग रचना अहवालासह राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आली होती. आयएएस अधिकारी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप रचनेवरील हरकती व सूचनांवर सुनावणी झाली होती. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून पाच हजार ९२२ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या परंतु सुनावणीच्या वेळी प्रत्यक्षात ८२८ नागरिकच उपस्थित होते. यामध्येही प्रभाग क्र. २४, ३४, ३८ आणि १९ मधूनच सर्वाधिक हरकतदार उपस्थित होते.
त्यानंतर नगरविकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे हरकती सूचनांवरील सुनावणीनंतरचा अहवाल पाठविला होता. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पुणे महापालिकांच्या अंतिम प्रभाग रचनेचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर पुणे महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. प्रभाग रचना पुणे महापालिकेकडे पाठविली आहे. अंतिम प्रभाग रचनेचे गॅझेट येत्या सोमवारपर्यंत प्रसिद्ध केले जाणार आहे.