निर्दयीपणाचा कळस! वृद्ध महिलेच्या छातीवर लाथ मारून लुबाडले, खेडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 14:09 IST2022-10-04T14:08:13+5:302022-10-04T14:09:16+5:30
अंगावरील तीन लाख रूपये किंमतीचे गळयातील सोन्याचे मणीमंगळसुत्र व सोन्याचे डोरले, कानातील सोन्याची कुडी जबरदस्तीने गळयातून व कानातून हिसका मारून काढून घेतले

निर्दयीपणाचा कळस! वृद्ध महिलेच्या छातीवर लाथ मारून लुबाडले, खेडमधील घटना
राजगुरुनगर : शेतात काम करणाऱ्या वृध्द महिलेच्या तोंडात स्कार्प कोंबून, मारहाण करून अंगावरील तीन लाखाचे सोन्याचे दागिने चोरून पळ काढणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी पकडले. गोरक्षनाथ भगवान पिंगळे (रा. वडगाव काशिंबे, ता आंबेगाव), देशराज दिलीप होले (रा. ठाकूर पिंपरी , ता खेड) अशी आरोपीची नावे असून अरूण धोंडीभाऊ आंद्रे (रा. वाजवणे, ता. खेड,) यांनी या घटनेबाबत खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दि ३ रोजी दुपारी ४ वाजता वाजवणे येथे साकुर्डी फाटया जवळ हि घटना घडली. जनाबाई धोंडीभाऊ आंद्रे या वृध्द महिला शेतात काम करीत असताना आरोपीनी वृध्द महिलेच्या तोंडात स्कार्प कोंबून छातीवर लाथ मारून हाताने ओरबाडून जखमी केले. अंगावरील तीन लाख रूपये किंमतीचे गळयातील सोन्याचे मणीमंगळसुत्र व सोन्याचे डोरले, कानातील सोन्याची कुडी जबरदस्तीने गळयातून व कानातून हिसका मारून काढून घेतले. चोरी करुन पळून जात असताना देवोशी (ता खेड) गावात ग्रामस्थांनी पकडून खेड पोलिसांच्या ताब्यात दिले.