पाडेगांव येथे ऊसाची ट्रॉली अंगावरून गेल्याने वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 17:17 IST2024-03-05T17:17:45+5:302024-03-05T17:17:54+5:30
चालकाने वेडा - वाकडा ट्रॅक्टर चालवल्याने दुचाकीला धक्का लागून हा अपघात घडला

पाडेगांव येथे ऊसाची ट्रॉली अंगावरून गेल्याने वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, एक जखमी
नीरा : नीरा नजिक पाडेगांव (ता.खंडाळा) येथील जयदुर्गा मंगल कार्यालयजवळून पाडेगांव फार्मकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऊसाने भरलेली ट्रॉली अंगावरून गेल्याने दुचाकीवरील वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.४) संध्याकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. अलका किसन लडकत (वय ७०) रा. निळूंज (ता.पुरंदर) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नांव आहे.
लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी (दि.४) संध्याकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास किसन विठ्ठल लडकत व अलका किसन लडकत (रा.निळूंज, ता.पुरंदर, जि.पुणे) हे पाडेगांव फार्म येथील नातेवाईकांचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून नीरा बाजूकडे निघाले होते. समोरून पाडेगांव येथील जुन्या टोल नाक्याजवळील जयदुर्गा मंगल कार्यालयाजवळून पाडेगांव फार्मकडे ऊसाने दोन ट्रॉली भरून चालला होता. ट्रँक्टर चालक नितीन शिवाजी भंडलकर हा वेडा वाकडा ट्रँक्टर चालवित असताना दुचाकीला उजव्या बाजूचा पाठीमागील चाकाचा धक्का लागला. त्यामुळे दुचाकी वरील किसन लडकत व अलका लडकत बाजूस पडले. त्यावेळी अलका लडकत यांच्या अंगावरून ट्रॅक्टरला जोडलेल्या व ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या अंगावरून गेल्याने त्या जागीच मृत्यूमुखी पडल्या. या घटनेची फिर्याद संदीप दत्तात्रय होले रा. खानवडी ता.पुरंदर यांनी लोणंद पोलिस स्टेशनला दिली. यावरून लोणंद पोलिसांनी ट्रँक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास लोणंद पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार धनाजी भोसले करीत आहे.