शिंदे नाराज नाहीत; राज्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी आम्ही प्रयत्नशील, अजित पवारांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 18:32 IST2025-09-13T18:24:05+5:302025-09-13T18:32:32+5:30
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघांमध्ये अजिबात नाराजी नसून आम्ही तिघेही समन्वयाने काम करत आहोत

शिंदे नाराज नाहीत; राज्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी आम्ही प्रयत्नशील, अजित पवारांचे स्पष्टीकरण
हडपसर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चेवर अजित पवारांनी भाष्य करून पूर्णविराम दिला आहे. दोघांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले. हडपसर येथे पवार यांच्या पुढाकारातून हडपसर येथे ‘जनसंवाद’ अभियानाची सुरुवात झाली. या अभियानात नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी असल्याच्या चर्चांना फेटाळत पवार म्हणाले, आम्ही तिघेही समन्वयाने काम करत आहोत. राज्याचा कारभार सुरळीत चालावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असा दावा त्यांनी यावेळी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाल्याने एकनाथ शिंदेमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे.
कोमकर हत्या प्रकरणी त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. लहान वयातील मुलं गुन्ह्याकडे वळत असल्याने केंद्र सरकारने १८ आणि २१ वर्षांची वयोमर्यादा कमी करण्याचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. आरोपींवर मोक्का लावण्यात आला असून कठोर कारवाई सुरू आहे. पोलिसांनी कोणताही राजकीय दबाव न घेता पारदर्शक तपास करावा, अशा सूचना दिल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
सातारा गॅझेट प्रकरणात कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, सर्वांनी बसून मार्ग काढला जाईल, असे पवार म्हणाले. महिला IPS प्रकरणावर त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. भारत-पाकिस्तान सामन्याबाबत सामना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच लोकसंख्या वाढली तसेच प्रभाग रचना बदल झालेत. आणि लोकसंख्या वाढीमुळे २०२९ मध्ये खासदारांची संख्या वाढेल, असेही त्यांनी सांगितले.