पुणे: शेतकऱ्यांनी उद्योजकही व्हावे असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी लागणारे आवश्यक ते सर्व मार्गदर्शन व तांत्रिक साह्य सरकारकडून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून करण्यात येईल अशी ग्वाही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठीच्या कार्यशाळेत दिली. शेतकऱ्यांचा सर्वसमावेश विकास हाच सरकारचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) यांच्या वतीने वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेत गुरूवारी दिवसभर शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. कृषीमंत्री कोकाटे, राज्यकृषीमंत्री आशिष जयस्वाल,कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीण देवरे, स्मार्ट प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, अतिरिक्त संचालक उदय देशमुख, आत्मा प्रकल्प संचालक सुनील बोरकर उपस्थित होते.
कोकाटे म्हणाले, स्मार्ट प्रकल्प शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी ठरत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रकल्प उभारणीसाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात शासन सक्रिय भूमिका बजावत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि कृषी समृद्धी योजना यांच्या समन्वयातून भांडवली गुंतवणूक करुन शेतकऱ्यांचा सर्व समावेशक विकास साधला जाणार आहे. जयस्वाल यांनीही मार्गदर्शन केले.प्रकल्प संचालक डॉ. वसेकर यांनी शेतमाल बाजाराशी जोडणी, वित्तीय सुलभता आणि शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीओ) धोरण २०२५ याविषयी सांगितले. बोरकर यांनी अंमलबजावणी यंत्रणेच्या कामकाजाची माहिती दिली. विविध जिल्ह्यांतील कृषी अधिकारी व शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी कार्यशाळेला उपस्थित होते.