Mangaldas Bandal: ईडी कोर्टाकडून मंगलदास बांदल यांना सशर्त जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 18:09 IST2025-03-11T18:07:28+5:302025-03-11T18:09:03+5:30
शिवाजीनगर बँक घोटाळा प्रकरणी बांदल यांनी २१ महिने तुरुंगवास भोगल्यानंतर ईडीच्या कारवाईत बांदल यांना ६ महिने कारावास भोगावा लागला

Mangaldas Bandal: ईडी कोर्टाकडून मंगलदास बांदल यांना सशर्त जामीन मंजूर
शिक्रापूर : पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती मंगलदास बांदल यांना ईडीच्या न्यायालयाने ६ महिन्यानंतर सशर्त जामीन मंजूर केला आहे. ईडीचे न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी बांदल यांचा जामीन मंजूर केला आहे.
२१ ऑगस्ट २०२४ रोजी बांदल यांच्या शिक्रापूर व महंमदवाडी या निवासस्थानी ईडीने कारवाई करीत साडेपाच कोटी रक्कम हस्तगत केली होती. तर त्यांच्या ८५ कोटी किंमतीच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. मणीलॉडरींग तसेच अनेक गुन्हे बांदल यांच्यावर दाखल झाले होते. शिवाजीनगर बँक घोटाळा प्रकरणी बांदल यांनी २१ महिने तुरुंगवास भोगल्यानंतर ईडीच्या कारवाईत बांदल यांना ६ महिने कारावास भोगावा लागला आहे.
मंगलदास बांदल यांच्या वतीने अँड.अबाद फोंडा,अँड. अदित्य सासवडे, अँड. शेलेश खरात ,अँड तन्मय काटे यांनी ईडी कोर्टात बाजू मांडली. प्रत्येक राजकीय पक्षाशी संधान ठेऊन असलेल्या बांदल यांनी गत लोकसभा निवडणूकीसाठी वंचित आघाडीने उमेदवार म्हणून घोषित केले होते. त्यानंतरही राजकीय उलथापालथ पाहून वंचित आघाडीने बांदल यांची उमेदवारी रद्द केली होती. त्यानंतर बांदल यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार केला होता. बारामती मतदारसंघात प्रचारात त्यांनी थेट शरद पवार यांच्यावर टिकास्त्र सोडले होते. तर कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनाही अजित पवार यांच्यापुढेच जोरदार टिकास्त्र सोडले होते. जिल्ह्यातील लोकसभा निवडणुक त्यांच्या विशेष टिकेने गाजली. बांदल सर्व राजकीय पक्षांच्या अतिशय जवळ असूनही त्यांच्यावर थेट ईडीने कारवाई केल्याने ही कारवाई विशेष चर्चेत आली होती.