लाच लुचपतची पहाटे येरवडा पोलीस ठाण्यात कारवाई; १३ हजारांची लाच घेणाऱ्या हवालदाराला अटक

By विवेक भुसे | Published: June 13, 2023 10:10 AM2023-06-13T10:10:49+5:302023-06-13T10:10:58+5:30

लाच घेताना एका हवालदाराला अटक केली असून, त्याला सहाय्य करणार्‍या अन्य दोन हवालदारांवर गुन्हा दाखल

Early morning operation of bribery in Yerwada police station Constable arrested for accepting bribe of 13 thousand | लाच लुचपतची पहाटे येरवडा पोलीस ठाण्यात कारवाई; १३ हजारांची लाच घेणाऱ्या हवालदाराला अटक

लाच लुचपतची पहाटे येरवडा पोलीस ठाण्यात कारवाई; १३ हजारांची लाच घेणाऱ्या हवालदाराला अटक

googlenewsNext

पुणे : कारला झालेल्या अपघाताची तक्रार दाखल करुन घेण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच घेणार्‍या पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पहाटे सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्याला सहाय्य करणार्‍या अन्य दोन पोलीस हवालदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार राजेंद्र दीक्षित असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीस हवालदार जयराम सावलकर आणि पोलीस हवालदार विनायक मुधोळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या कारला अपघात झाला होता.  या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी तिघा पोलीस हवालदारांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर सोमवारी त्याची पडताळणी केली. त्यात त्यांनी तडजोड करुन १३ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. रात्री उशिरापर्यंत पोलीस नजर ठेवून होते. पोलिसांनी तक्रारदार याची तक्रार मध्यरात्रीनंतर दाखल करुन घेतली. त्यानंतर हवालदार राजेंद्र दीक्षित यांनी तक्रारदाराकडून १३ हजार रुपये स्वीकारले. तसा इशारा तक्रारदाराने केल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दीक्षित याला ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, मुकुंद आयाचित, पोलीस शिपाई भूषण ठाकूर, पांडुरंग माळी यांनी ही कारवाई केली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

Web Title: Early morning operation of bribery in Yerwada police station Constable arrested for accepting bribe of 13 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.