Pune: नवीन वर्षात 'या' मार्गावर धावणार ई-डबल डेकर बस; पुणेकरांना मिळणार हायटेक सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 16:26 IST2025-12-18T16:26:04+5:302025-12-18T16:26:29+5:30
Pune E-Double Decker Bus: संपूर्ण वातानुकूलित, प्रदूषणमुक्त आणि जादा प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या बस शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यास उपयुक्त ठरणार

Pune: नवीन वर्षात 'या' मार्गावर धावणार ई-डबल डेकर बस; पुणेकरांना मिळणार हायटेक सुविधा
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) २५ इलेक्ट्रिक बस घेण्याचा अंतिम निर्णय झाला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, नवीन वर्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख मार्गांवर डबल डेकर बस धावताना दिसणार आहेत.
पीएमपीच्या संचालक मंडळाने यापूर्वीच या बस घेण्यासाठी मान्यता दिली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात हिंजवडी, भोसरी, कोरेगाव पार्क, विमाननगर आदी भागांतील रस्त्यांवर दहा दिवसांची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. दरम्यान, डबल डेकर बसमुळे जास्त प्रवाशांना करता येणार आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना गर्दीच्या वेळी फायदा होणार आहे. इलेक्ट्रिक बस असल्याने त्यांच्या बॅटरी कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यांची विशेष समिती नेमण्यात आली होती. समितीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर अखेर २५ ई-डबल डेकर बस घेण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे. मुंबईत डबल डेकर बसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना, त्याच धर्तीवर पुणे-पिंपरीकरांनाही या सुविधेचा लाभ देण्यासाठी पीएमपीकडून प्रयत्न सुरू होते. संपूर्ण वातानुकूलित, प्रदूषणमुक्त आणि जादा प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या बस शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यास उपयुक्त ठरणार आहेत. बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर प्रवाशांच्या प्रतिसादानुसार मार्ग निश्चित केले जाणार आहेत.
या मार्गांवर धावणार ई-डबल डेकर बस
- हिंजवडी फेज ३ ते हिंजवडी फेज ३ (वर्तुळ मार्ग)
- रामवाडी मेट्रो स्टेशन ते खराडी
- मगरपट्टा सिटी ते कल्याणीनगर मेट्रो स्टेशन
- पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ
- देहू ते आळंदी
- चिंचवड ते हिंजवडी
डबल डेकर बसची वैशिष्ट्ये
- प्रवासी क्षमता : ६० बसून, २५ उभे (एकूण ८५)
- आकारमान : उंची ४.७५ मीटर, रुंदी २.६ मीटर, लांबी ९.५ मीटर
- अंदाजे किंमत : प्रत्येकी सुमारे २ कोटी रुपये
भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिक डबल डेकर बस घेण्यास संचालक मंडळाची मान्यता मिळाली होती. बॅटरी तंत्रज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर २५ बस घेण्याचा निर्णय घेतला असून निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. - पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी