धुळ, आवाज, ट्राफिकचा नागरिकांना त्रास; आता इमारत पाडण्यासाठी पुणे महापालिकेची नियमावली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 20:17 IST2025-11-05T20:17:05+5:302025-11-05T20:17:50+5:30
इमारतींच्या पुनर्विकासाची बहुसंख्य कामे राजकीय मंडळी, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आणि बिल्डर यांच्या संयुक्त युतीमधूनच केली जातात. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतानाही तक्रार करणे टाळतात.

धुळ, आवाज, ट्राफिकचा नागरिकांना त्रास; आता इमारत पाडण्यासाठी पुणे महापालिकेची नियमावली जाहीर
पुणे: शहरातील जुन्या इमारती पाडताना सुरक्षेसंबंधी योग्य ती काळजी घेतली जात नाही. मात्र, आता महापालिकेने जुन्या इमारती पाडण्यासाठी पाडकाम नियमावली तयार केली आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने तयार केलेल्या या धोरणाला महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मंजुरी दिली आहे.
शहरातील मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमध्ये जुन्या इमारती, बंगले पाडून तेथे नवीन टोलेजंग इमारत बांधण्याचे अनेक कामे केली जातात. जुन्या इमारती पाडताना धुळ, आवाज, वाहनांची वाहतूक यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. हे काम करताना योग्य त्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात नाही. तसेच पाडकामासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ वापरले जात नाही. इमारतींच्या पुनर्विकासाची बहुसंख्य कामे राजकीय मंडळी, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आणि बिल्डर यांच्या संयुक्त युतीमधूनच केली जातात. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतानाही तक्रार करणे टाळतात.
पाडकामाच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने नियमावली तयार करावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी जुलै महिन्यात महापालिकेला पत्र दिले होते. तसेच त्याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानुसार बांधकाम विभागाने पाडकामासाठी एक नियमावली तयार करून महापालिका आयुक्तांसमोर मांडली होती. या नियमावलीला महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी मान्यता दिली. नियमावलीतील तरतुदींची पूर्तता करून पाडकाम केले तरच त्या जागेवर नवीन इमारत बांधण्यास परवानगी दिली जाणार असल्याचे नियमावलीत नमूद केले आहे.
पाडकामाची अशी आहे नियमावली
- पाडकाम करताना सीमेवर २५ फूट उंचीचे पत्रे लावावेत.
- पाडकाम करताना पूर्णवेळ सुरक्षारक्षक नेमावा.
- शेजारील इमारतीला धोका पोचणार असल्यास ती इमारत रिकामी करावी.
- धूळ उडू नये यासाठी पाणी मारणे, स्प्रिंकलर सिस्टिम बसवावेत.
- पर्यावरणाला धोका पोहोचू नये, याची काळजी घ्यावी.
- पाडकाम सुरू करण्यापूर्वी शेजारच्या सोसायट्या पोलिस व अग्निशामक दलाला लेखी माहिती द्यावी.
- साहित्य वाहतूक करताना त्यावर हिरव्या रंगाचे कापड टाकावे.
- पाडकामाचे फोटो महापालिकेकडे सादर करावेत.
- तांत्रिकदृष्ट्या योग्य व सुरक्षेच्यादृष्टीने पाडकाम पूर्ण झाल्याचा दाखला स्ट्रक्चरल इंजिनियरने सादर करावा.
इमारतींचा पुनर्विकास व पाडकाम करताना सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. याचा नागरिकांना त्रास होतो. महापालिकेने आता नियमावली केली आहे, याची कडक अंमलबजावणी करावी, त्यावर आयुक्तांनी लक्ष ठेवावे. - हेमंत संभूस, सरचिटणीस, मनसे.