पुणे : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना नगर रस्त्यावरील अष्टापूर भागात घडली. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिवाजी उत्तम खोत (वय ५७, रा. दत्तवाडी, उरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत बालाजी विलास खोत (वय ४३, रा. दत्तवाडी, उरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, दुचाकीस्वार शिवाजी खोत हे १७ जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास नगर रस्ता भागातील अष्टापूर ते उरळी कांचन रस्त्याने निघाले होते. त्यावेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार खोत यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या खोत यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक तुकाराम सुरवसे तपास करीत आहेत.
डम्परचे चाक डोक्यावरून गेले पुणे - सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता.हवेली) येथे रविवारी (दि. १९) दुपारी सव्वातीन वाजता दुचाकी आणि डम्परच्या अपघातात खंबेश्वर शिक्षण संस्था खामगाव (ता.दौंड) येथील माजी मुख्याध्यापक संजीव धर्माजी नेवसे (वय ५९ रा.हडपसर) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची घटना श्रेयश नर्सरी समोर घडली. नेवसे सर उरुळी कांचन येथे एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानंतर हडपसरकडे जाण्यासाठी एका दुचाकीस्वारासोबत निघाले होते. सोरतापवाडी येथे समोरील चारचाकी वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने नेवसे सर महामार्गावर पडले आणि पाठीमागून आलेल्या डम्परचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर डम्पर चालक फरार झाला असून, उरुळी कांचन पोलिस ठाण्यात अज्ञात डम्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे अधिक तपास करत आहेत.