शिक्रापूर : शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना पाण्याची भीषण टंचाई जाणवत असून शासनाने दिलेले टँकर कमी पडत आहेत. यामुळे तालुक्यातील अनेक गावांत व वाड्यावस्त्यांवर टँकरच्या मागणीत वाढ होत आहे.पाण्याचे स्रोत आटल्यामुळे यापूर्वी अनेक गावांनी पंचायत समितीकडे पाण्यासाठी टँकरची मागणी केली होती. त्या वेळी प्रशासनाने शिरूर तालुक्याच्या पश्निम भागात १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू केले होते. आता दुष्काळाची परिस्थिती पाहता, प्रशासनाने टँकरच्या संख्येत वाढ केली आहे. परंतु तीदेखील अपूर्ण पडत आहे. सध्या शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी, कान्हूर मेसाई, केंदूर, पाबळ, खैरेवाडी, धामारी, खैरेनगर या गावांसह तब्बल ७६ वाड्यावस्त्यांवर टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्या पाण्याची समस्यादेखील मोठी असून, टँकरच्या होणाऱ्यां खेपांमध्ये वाढ करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
खेड शिवापूर : आर्वी-तानाजीनगर (ता. हवेली) येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत असून ग्रामपंचायतीच्यावतीने गावात दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस या परिसरात टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. ४येथील काही गावे आणि वस्त्यांवर जवळपास १२ ते १५ कूपनलिका आहेत. त्यापैकी काहींना थोडेसे पाणी आहे. कूपनलिकेतील पाण्याच्या साठ्यानुसार आणि क्रमानुसार रात्री-अपरात्री नागरिकांना पाणी भरावे लागत आहे. ४पाण्यासाठी भांड्यांच्या रांगा लागलेल्या असतात. काही कूपनलिका पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. तसेच आर्वी-तानाजीनगर येथे प्रत्येकी एक अशा नळ-पाणीपुरवठ्याच्या विहिरी असून त्याद्वारे गावात नळाद्वारे पाणी सोडण्यात येत असते. मात्र, या विहिरींनीही तळ गाठला असून या विहिरीत ग्रामपंचायतीच्यावतीने टँकरने पाणी विकत घेऊन सोडले जाते. परंतु या विहिरीत पुरेसा पाणीसाठा नसल्याने आठवड्यातून दोन वेळा नळाद्वारे सोडले जाते. इतर दिवशी विहिरीतून पाणी उपसून आणावे लागत आहे. .....येथील ग्रामस्थ नामदेव तुकाराम शिंदे यांच्या कूपनलिकेतील पाणी येथील सार्वजनिक नळ-पाणीपुरवठ्याच्या विहिरीत सोडले आहे. यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. प्रशासनच्यावतीने पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करावा, यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने ४ एप्रिलला ठरावाद्वारे मागणी करण्यात आली होती. परंतु प्रशासनाने अद्याप याची दखल घेतली नसून टँकर सुरू झालेले नाहीत.