दारू पिली अन् थेट पोलिसाची कॉलर पकडली! दहशत माजवणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या
By नितीश गोवंडे | Updated: February 12, 2025 17:32 IST2025-02-12T17:32:09+5:302025-02-12T17:32:28+5:30
वडगाव शेरी येथील सोपान नगर परिसरात चारजण मद्यपान करून कारमधील साऊंड सिस्टिमवर नाचत धिंगाणा घालत होते

दारू पिली अन् थेट पोलिसाची कॉलर पकडली! दहशत माजवणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या
पुणे : मद्यपान केल्यानंतर कारमधील साउंड सिस्टीम जोरात वाजवत धिंगाणा घालणे चौघांच्या अंगलट आले आहे. बीट मार्शलवर दादागिरी करत, दोघांपैकी एकाची कॉलर पकडणे तसेच परिसरात दहशत माजवल्याप्रकरणी चौघांना चंदननगर पोलिसांनीअटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. १०) रात्री सव्वा नऊच्या सुमारास वडगाव शेरी येथील सोपान नगर येथे घडली आहे.
स्वप्नील संजय काळदाते (२५, रा. भिंगार, अहिल्यानगर), अक्षय अशोकराव इंगोले (२९, रा. परभणी), समीर गौतम डंबाळे (२२ रा. गणेशनगर, बोपखेल) आणि अभिजीत राजेंद्र निकम (२०, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार अजित कोकाटे यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अंमलदार अजित कोकाटे हे चंदननगर पोलिस ठाण्यात बीट मार्शल आहेत. १० फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास वडगाव शेरी येथील सोपान नगर परिसरात चारजण मद्यपान करून धिंगाणा घालत असल्याचा कॉल पोलिस नियंत्रण कक्षाला आला होता. त्यानुसार कोकाटे सहकार्यासोबत घटनास्थळी गेले. त्यावेळी चारजण मद्यधुंद अवस्थेत कारमधील साऊंड सिस्टिमवर नाचत धिंगाणा घालत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना समजावून सांगितले. त्याचा राग आल्यामुळे चौघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करत, पोलिसाची कॉलर पकडत दादागिरी केली. परिसरात दहशत माजवल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे करत आहेत.