‘द्रोणा’ श्वानाने वास हुंगला अन् रेल्वेत झटक्यात सापडला ३२ किलो गांजा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 13:17 IST2023-10-08T13:17:33+5:302023-10-08T13:17:52+5:30
श्वान द्रोणाने वास घेतल्यावर त्यात काही संशयास्पद वस्तू असल्याचा इशारा त्याने हँडलर जवानाला केला

‘द्रोणा’ श्वानाने वास हुंगला अन् रेल्वेत झटक्यात सापडला ३२ किलो गांजा!
पुणे : पुणे रेल्वे सुरक्षा दलाच्या श्वान पथकाने तपासणी दरम्यान पुणे स्थानकावर भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस गाडी क्र. ११०२० ही रेल्वे पुणे स्थानकावर रात्री गुरूवारी सव्वा अकराच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उभी असताना जनरल कोचमध्ये आसन क्रमांक २१ खाली १ निळ्या रंगाची ट्रॉली बॅग आढळली आणि सीट क्रमांक ४१ खाली १ लाल रंगाची ट्रॉली बॅग आढळली. अशा २ ट्रॉली बॅगमध्ये श्वान ‘द्रोणा’च्या मदतीने ३२ किलो गांजा जप्त केला आहे. याची किमत २ लाख ५० हजार इतकी आहे.
रेल्वे सुरक्षा दलाचे श्वान पथक आणि स्टेशनवरील रेल्वे सुरक्षा दल ठाणे असे संयुक्त पथक श्वान द्रोणासोबत स्थानकावर गाडीची नियमित तपासणी करत होते. गाडीचा सामान्य श्रेणी कोच तपासत असताना डब्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन ट्रॉली बॅग आढळली. त्या बॅगेजवळ कोणी नसल्याने संशय बळावला. तसेच श्वान द्रोणाने वास घेतल्यावर त्यात काही संशयास्पद वस्तू असल्याचा इशारा त्याने हँडलर जवानाला केला. रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने तपासणी केली असता, ट्रॉलीमध्ये ३२ किलो गांजा आढळला.
जप्त केलेला मादक पदार्थ जीआरपी, पुणे यांच्या ताब्यात देण्यात आला असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील कारवाई सुरू आहे. द्रोणा श्वानमुळे कारवाई करण्यास यश मिळाले. काही दिवसांपूर्वीच याच श्वानने दोन किलो मादक पदार्थ पकडण्यात मदत केली होती. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त रेल्वे सुरक्षा दल उदयसिंह पवार यांनी रेल्वे सुरक्षा दल व श्वान पथकातील जवानांचे, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.