आरोग्याशी खेळ ! नदीबरोबरच आता धरणातही मैलापाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 06:00 IST2020-02-11T06:00:00+5:302020-02-11T06:00:10+5:30
ड्रेनेजचे पाणी नदीत किंवा धरणात सोडण्यापुर्वी नियमाप्रमाणे त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक

आरोग्याशी खेळ ! नदीबरोबरच आता धरणातही मैलापाणी
पुणे : मुळा, मुठा नद्यांबरोबरच आता खडकवासला धरणातही मैलापाणी सोडले जाऊ लागले आहे. धरणाच्या आसपासच्या गावांचे नागरीकरण होत असून तिथे बांधण्यात येणाऱ्या सोसायट्यांमधील ड्रेनेज धरणात सोडले जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे होत आहेत. पुणेकरांच्या सार्वजनिक आरोग्याशी यातून खेळ होत आहे.
शहरातून वाहणाऱ्या मुठा तसेच मुळा या नद्यांमध्ये गेली अनेक वर्षे ड्रेनेजचे पाणी सोडले जाते. त्यामुळे या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण शुन्यावर आले असून पाण्यातील जैवविविधता नष्ट झाली असल्याचे पर्यावरणविषयक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तोच प्रकार आता पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात होत आहे. धरणाच्या भोवताली अनेक गावे आहेत. या गावांमध्ये वेगाने नागरीकरण होत आहे. मोठ्या सोसायट्या बांधल्या जात आहेत. अनधिकृत बांधकामाचे प्रमाणही बरेच आहे.
या सोसायट्यांच्या ड्रेनेजसाठी शोषखड्डे घेतले जातात. ड्रेनेजचे पाणी सोडण्याची काहीच व्यवस्था नसल्याने बांधकाम व्यावसायिक किंवा खासगी बंगलेवालेही शोष खड्डा करून तिथेच हे पाणी मुरवतात. ते पाणी झिरपून धरणात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी याबाबत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना नुकतेच निवेदन दिले. त्यात त्यांनी गावांची नावेही दिली आहेत. महापालिकेने याकडे लक्ष द्यावे. धरणातून पाणी पिण्यासाठी सोडले जाण्यापुर्वी त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जात असली तरी पाण्यात या पद्धतीने मैलापाणी झिरपणे धोकादायक आहे, त्यामुळे महापालिकेने या गावांची पाहणी करून असे होत असेल तिथे त्वरीत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
आयुक्तांबरोबरच बागूल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही याबाबतचे निवेदन पाठवले आहे. ड्रेनेजचे पाणी नदीत किंवा धरणात सोडण्यापुर्वी नियमाप्रमाणे त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे, मात्र या गावांमध्ये कुठेही अशी प्रक्रिया करणारे प्रकल्प नाहीत. त्यामुळे ते पाणी एकतर थेट धरणात सोडले जाते किंवा शोषखड्डे करून जमिनीत मुरवले जाते हे स्पष्ट असूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही असे त्यांनी त्यात नमुद केले आहे. जगभरात साथीच्या आजारांची लाट आलेली असताना पिण्याच्या पाण्याबरोबर सुरू असलेली ही बेपर्वाई त्वरीत बंद करावी असे त्यांनी म्हटले आहे.-
-------------------------------