फुले चित्रपटाचा ट्रेलर बघून मत बनवू नये, ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित होईल - अनंत महादेवन
By नितीन चौधरी | Updated: April 11, 2025 20:57 IST2025-04-11T20:55:46+5:302025-04-11T20:57:30+5:30
चित्रपट पाहिल्यानंतर जोतिबा फुले आणि ब्राह्मण यांच्यातील संतुलित संबंध स्पष्ट होतील

फुले चित्रपटाचा ट्रेलर बघून मत बनवू नये, ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित होईल - अनंत महादेवन
पुणे : महात्मा फुले चित्रपटातील दृश्यांविषयी विविध संघटनांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी, विरोध होत आहे, म्हणून आम्ही चित्रपट तसा तयार केलेला नाही. जोतिबा आणि सावित्रीबाई फुले हे कोणत्याही गोष्टीला घाबरले नाही. त्यामुळे अशा निडर लोकांवर चित्रपट तयार केला आहे. अशा विरोधाला घाबरल्यास त्यांच्यासोबत विश्वासघात केल्यासारखे होईल. आम्ही त्याचा विचार करत नाही. आम्ही प्रामाणिकपणे चित्रपट तयार केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर बघून मत बनवू नये. चित्रपट ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित होईल, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “सेन्सॉर बोर्डाने सांगितलेले बदल आम्ही केले आहेत. कोणतेही दृश्य वगळण्याचे त्यांनी सांगितलेले नव्हते. बोर्डाने चित्रपटाला यु प्रमाणपत्र दिले आहे. लोकांनी विरोध करण्याऐवजी चित्रपट पाहावा. केवळ ट्रेलर पाहून मतप्रदर्शन करू नये. चित्रपट पाहिल्यानंतर जोतिबा फुले आणि ब्राह्मण यांच्यातील संतुलित संबंध स्पष्ट होतील.”
चित्रपट तयार करण्यासाठी जोतिबा फुले यांच्यावरील मराठी हिंदी व इंग्रजी भाषेतील अनेक पुस्तकांमधून संदर्भ घेतले आहेत. त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर हा चित्रपट तयार केला आहे. त्यामुळे चित्रपट पाहिल्यानंतर त्यातील व्यक्तिरेखा आणि परिस्थिती कळू शकेल, असेही ते यावेळी म्हणाले. काही संघटनांच्या सूचनेनुसार दृश्य वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे, यावर त्यांनी असे कोणतेही दृश्य वगळण्यात आले नसल्याचे स्पष्ट करत याबाबत कोणाचाही दबाव नसल्याचे ते म्हणाले. मात्र, ओबीसी संघटनांनी चित्रपटातील सर्व दृश्य कायम ठेवावीत असेही सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.