पुण्याचे वैभव असणाऱ्या टेकडीवर सिमेंटीकरणाचा 'विकास' नकोच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:22 PM2021-04-01T16:22:59+5:302021-04-01T16:24:15+5:30

विनाकारण कोणत्याही प्रकल्पावर पैसे खर्च न करण्याचे निसर्गप्रेमींचे मत

Don't deny the 'development' of cementation on the glorious hill of Pune! | पुण्याचे वैभव असणाऱ्या टेकडीवर सिमेंटीकरणाचा 'विकास' नकोच !

पुण्याचे वैभव असणाऱ्या टेकडीवर सिमेंटीकरणाचा 'विकास' नकोच !

Next
ठळक मुद्देवन विभागाकडेे संस्थांकडून तक्रार: वन्यजीवांच्या संवर्धनासाठी अधिक प्रयत्न करायला हवेत

म्हातोबा टेकडीवर नक्षत्र वनासाठी सुरू असलेल्या ब्लाँक्सच्या कामावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, टेकड्या पुण्याचे वैभव आहेत, तिथे कोणताही 'विकास' नको अशी नागरिकांनी भावना आहे.  नैसर्गिक टेकडी ठेवून तिथले वन्यजीव, जैविविधता टिकवली पाहिजे. विनाकारण पैसे कोणत्याही प्रकल्पावर खर्च करू नयेत, असे मत निसर्गप्रेमींनी व्यक्त केले आहे. 

म्हातोबा टेकडीवर नक्षत्र वनाच्या कामाचे वृत्त 'लोकमत'ने प्रसिध्द केले होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी देखील याबाबत ट्विट करून नेमका काय प्रकार आहे, ते जाणून कार्यवाही करू, असे सांगितले आहे. त्यांनाही या प्रकल्पाची काहीच माहिती नाही. 

निसर्गप्रेमी पंकज आनंद म्हणाले, शहरातील उद्याने नीट जपावीत, टेकड्यांवर काहीही घाण करू नये. त्या जशा आहेत, तशाच ठेवाव्यात. तर अँड. विंदा महाजन म्हणाल्या, टेकडीवर कोणतेही काम करताना त्याविषयीचा माहितीफलक तिथे लावला पाहिजे. पण म्हातोबा टेकडीवर काहीही फलक नाही. एका दिवसात तिथं जिम उभी केली आहे. आता नक्षत्र वनाचा घाट सुरू आहे. निसर्गात येऊन लोकं व्यायाम करतात, तिथं हे कशाला हवं. टेकडीवर नक्षत्र वनासाठी सिमेंटीकरण आणि ब्लाँक्स नकोच. एक गोष्ट केली की, नंतर अनेक गोष्टी तयार करतात. 

संस्थांकडून वनसंरक्षकांना पत्र 
टेकडीवरील सिमेंटीकरणाला विरोध करत इकॉलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षा स्वाती गोळे, डेक्कन जिमखाना परिसर समितीचे सुषमा दाते, सुमिता काळे, माधवी राहीरकर, पुष्कार कुलकर्णी यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर, वनसंरक्षक पुणे आणि उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज पाठवले आहेत. टेकडीवर कोणतेही सिमेंटीकरण नको असून, नक्षत्र वनाचे ब्लॉक्स, जिमचे साहित्य त्वरित काढून टाकावेत, अशी मागणी केली आहे. त्यांनी नमूद केले आहे की, टेकडीवरील जैवविविधता जपावी आणि कोणतेही कृत्रिम बांधकाम करू नये, अन्यथा फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून तीव्र विरोध करण्यात येईल. यापूर्वी देखील असे प्रयत्न झाले, पण ते होऊ दिले नाहीत. त्यामुळे  येथील नागरिकांना टेकड्यांचे संवर्धन करायचे असून, वन विभागाने देखील नैसर्गिकपणे टेकड्या जपाव्यात.
           
एक ग्रुप तर टेकडीवर झाडं लावत सुटलाय. टेकडीची जैवविविधता काय असते, ते समजूनच घेत नाहीत. उठले की कुठंही झाडं लावत सुटतात. टेकडीवरील वन्यजीवांचे काय जीवन असते, त्यांना काय आवश्यक असते, ते पाहून कामं करायला हवीत. टेकडीची जमीन म्हणजे परसबाग नव्हे, की कोणतीही झाडं लावा. 

                                                              - आभा भागवत, म्हातोबा टेकडीचे संवर्धनासाठी काम करणाऱ्या निसर्गप्रेमी 

Web Title: Don't deny the 'development' of cementation on the glorious hill of Pune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.