लोणी काळभोर : मुलीला व्यवस्थित शिकवत नाहीत असे म्हणत कदम वाक वस्ती येथील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेला विद्यार्थिनीच्या पालकाने वर्गात घुसून छेडछाड व लगट करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी (दि. २८) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोणी काळभोरपोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश अंबिके (रा. लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ४० वर्षीय शिक्षिकेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या लोणी काळभोर परिसरातील एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात. शुक्रवारी शाळेतील विद्यार्थ्यांना गुणपत्रक देण्याचे काम सुरू होते. तेव्हा फिर्यादी व त्यांची सहशिक्षिका या विद्यार्थ्यांना गुणपत्रकाचे वाटप करत होते. त्यावेळी आरोपी गणेश अंबिके हा वर्गात आला आणि फिर्यादी यांना म्हणाला, आपली पुन्हा भेट झालीच नाही. मला तुमच्यासोबत महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे. तेव्हा फिर्यादी म्हणाल्या, कोणत्या विषयावर बोलायचे आहे, जे काही बोलायचे आहे, ते इथेच बोला. पुढे आरोपी म्हणाला, मॅडम तुम्ही वर्गाबाहेर चला. आपण बाहेर भेटून बोलुयात, मला इथे बोलता येणार नाही. त्यास फिर्यादी यांनी नकार दिला. त्यानंतर आरोपी गणेश अंबिके याने फिर्यादी यांचा हात धरून लगट करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी प्रतिकार करून हात झटकला, तेव्हा आरोपीने फिर्यादी यांना अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली. तुला काय करायचे असेल ते कर, मी कोणालाही घाबरत नाही, असे म्हणून फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांना मारहाण करून मनात लज्जा उत्पन्न होईल, असे गैरवर्तन केले. दरम्यान, फिर्यादी यांना मारहाण होत असल्याचे पाहून सहशिक्षिका भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपी गणेश अंबिके याने त्यांना ढकलून दिले. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांचाही विनयभंग केला. याप्रकरणी संबंधित शिक्षिकेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.