मुंडेंना उपचारासाठी विदेशात जाऊ देऊ नका; मराठा क्रांती मोर्चाची मागणी, पुण्यातील घरासमोर आंदोलन
By राजू इनामदार | Updated: March 5, 2025 17:13 IST2025-03-05T17:12:25+5:302025-03-05T17:13:16+5:30
संतोष देशमुख हत्येच्या गुन्ह्याबाबत त्यांची चौकशी व्हावीच, मात्र अशाच प्रकारांमधून त्यांना जमा केलेल्या संपत्तीवरही टाच आणली पाहिजे

मुंडेंना उपचारासाठी विदेशात जाऊ देऊ नका; मराठा क्रांती मोर्चाची मागणी, पुण्यातील घरासमोर आंदोलन
पुणे: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा तसेच मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर वैद्यकीय कारणासाठी म्हणून विदेशात जाण्यापासून त्यांना थांबवा अशी मागणी करत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी सकाळी मुंडे यांच्या पुण्यातील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले.
मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कुंजीर यांनी सांगितले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी व मुंडे यांचे राजकीय संबध आता उघड झाले आहे. त्यांच्याच पाठबळावर या आरोपींनी बीडचा बिहार केला. खूनाच्या गुन्ह्याबाबत त्यांची चौकशी व्हावीच, मात्र अशाच प्रकारांमधून त्यांना जमा केलेल्या संपत्तीवरही टाच आणली पाहिजे. मंत्रीपदाचा राजीनामा वैद्यकीय कारणासाठी दिला असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. हेच कारण देत ते आता वैद्यकीय उपचारांसाठी म्हणून परदेशात जाण्याची दाट शक्यता आहे. त्यांना सहआरोपी करून पोलिसांनी आताच त्यांना विदेशात जाण्यास मनाई करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चाच्या वतीने पोलिसांकडे आंदोलनासाठी परवानगी मागितली होती, मात्र घरासमोर आंदोलन नको असे कारण देत त्यांनी परवानगी नाकारली अशी माहिती पुणे जिल्हा समन्वयक सचिन आडेकर यांनी दिली. रेखा कोंडे, अमर पवार, युवराज दिसले, नागेश खडके, उत्तम कामठे, सचिन वडघुले, गणेश मापारी, जितेंद्र कोंढरे तसेच मराठा क्रांती मोर्चाचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंडे यांच्या गणेश खिंडीतील निवासस्थानासमोर सकाळीच जमले होते. पोलिसांनी त्यांना घोषणा देण्यापासून प्रतिबंध केला, मात्र तरीही तासभर घोषणा दिल्या जात होत्या. पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतर आंदोलकांनी घोषणा थांबवल्या व ते तिथून निघून गेले.