पुणे : शहरातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध तीन मंडळांनी कोणतीही परवानगी न घेता आणि मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डीजे वाजवला. या प्रकरणी पाेलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पूर्वपरवानगी न घेणे यासह ध्वनिप्रदूषणाच्या विविध कलमांन्वये डीजे चालक निशांत हेमंत पवार (रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिवजयंती उत्सव साजरा करताना मंडळे, त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते यांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या. त्या बैठकांत साउंड बॉक्स मर्यादित ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच आकाशात प्रखर लाइट बिम न सोडणे याबाबतही सूचना केल्या होत्या. तिथीप्रमाणे १७ मार्च रोजी शिवजयंतीदिवशी भारती बॅक मार्केट येथी पीआयसीटी कॉलेजसमोरील मित्रमंडळाने मोठ्या प्रमाणात लाउड स्पीकर उभा करून आवाजाची पातळी ओलांडली असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी झालेल्या गर्दीमुळे नागरिकांची गैरसोय झाली. आवाजाची पातळी सव्वा नऊच्या सुमारास १०६ डेसिबल नोंदवण्यात आली. यावेळी डीजेचालक तेजस विकास पवार (रा. सांगवी, ता. बारामती, जि. पुणे) याचा डीजे लावण्यात आल्याचे तक्रारी म्हटले आहे.
दुसऱ्या गुन्ह्यात संस्कार राहुल मांगडे आणि मंगलनाथ साउंड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भारती पोलिस चौकीसमोरील आंगण हॉटेलसमोर सार्वजनिक रस्त्यावर शिवरत्न प्रतिष्ठान या मंडळाने मोठ्या आवाजात मंगलनाथ साउंडचा डीजे लावला होता. यासाठी त्यांनी कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती. मोठ्या आवाजात डीजेवर गाणी वाजवून लोकांची गर्दी करून नागरिकांना अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तिसऱ्या गुन्ह्यात पीआयसीटी कॉलेजसमोर मोठ्या आवाजात डीजे लावून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी व आवाजाची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच लाऊडस्पीकर चालकाने डीजे वाजवण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नाही. या प्रकरणी दोस्ती ग्रुपचे अध्यक्ष ओंकार खुटवर आणि विन ऑडिओ या डीजेचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.