घटस्फोट! पती डॉक्टर असूनही दारूच्या आहारी, पत्नी कंपनीत नोकरदार, ‘कबीर सिंग’ चित्रपटासारखीच स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 17:55 IST2025-10-27T17:55:43+5:302025-10-27T17:55:55+5:30
पतीच्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे हिंसाचार आणि पती-पत्नीतील संबंध ताणले गेले

घटस्फोट! पती डॉक्टर असूनही दारूच्या आहारी, पत्नी कंपनीत नोकरदार, ‘कबीर सिंग’ चित्रपटासारखीच स्थिती
पुणे: ‘कबीर सिंग’ चित्रपटासारखीच स्थिती एका जोडप्याच्या आयुष्यात निर्माण झाली. पती डॉक्टर व पत्नी एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरदार. पती डॉक्टर असूनही दारूच्या आहारी गेला आणि त्यांचा संसार फिस्कटला. लग्नाच्या दोन वर्षांनी जोडपे विभक्त झाले. दोघांचे वय आणि पुनर्विवाहाची शक्यता लक्षात घेता कौटुंबिक न्यायालयाने सहा महिन्यांचा कूलिंग ऑफ कालावधी रद्द करीत, जोडप्याचा परस्पर संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश शुभांगी यादव यांनी हा निकाल दिला.
राकेश आणि स्मिता (नावे बदललेली) यांचे लग्न १४ जून २०२० मध्ये झाले. दोघेही कमावते आहेत. मात्र, पतीला दारू पिण्याचे व्यसन होते. पतीच्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे हिंसाचार आणि पती-पत्नीतील संबंध ताणले गेले. वैचारिक मतभेद आणि विसंगतीमुळे अखेर लग्नाच्या तीन वर्षांनंतर दोघे वेगळे राहू लागले. दोघांनी ॲड. निखिल कुलकर्णी यांच्यामार्फत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. कुटुंबांनीदेखील दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, दोघांचे समुपदेशनही झाले. मात्र, दोघे पुन्हा एकत्र येणे शक्य नसल्यामुळे सहा महिन्यांचा कूलिंग ऑफ कालावधी रद्द करण्याची मागणी जोडप्याच्या वतीने ॲड. कुलकर्णी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने पक्षकारांचे वय आणि पुनर्विवाहाची शक्यता लक्षात घेऊन कूलिंग ऑफ कालावधी रद्द करीत परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर केला. ॲड. निखिल कुलकर्णी यांना ॲड. मेहरपूजा माथूर यांनी सहकार्य केले.
वैवाहिक वादांमध्ये विविध गुंतागुंतीचे प्रश्न असल्याने ते सोडवण्यास बराच वेळ लागू शकतो. तथापि, पक्षकार वकिलांच्या आणि मध्यस्थांच्या मदतीने प्रथम हे मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करू शकतात आणि नंतर घटस्फोटासाठी न्यायालयात जाऊ शकतात. अशा प्रकारे पती-पत्नी जलद आणि त्रासमुक्त मार्गाने न्याय मिळवू शकतात. परस्पर संमतीने घटस्फोटाची याचिका पती-पत्नींनी संयुक्तपणे आणि स्पष्टपणे दाखल करावी. पक्षकारांकडून वेळेवर सूचना आणि वकिलांकडून कागदपत्रे कार्यक्षमतेने तयार करणे आणि सादर करणे यामुळे प्रक्रिया जलद होऊ शकते. आम्ही १९ दिवसांच्या आत संपूर्ण खटला निकाली काढण्यात यशस्वी झालो. - ॲड. निखिल कुलकर्णी, पती-पत्नीचे वकील