पुणे - बंगळुरु महामार्गावर अडकलेल्या वाहनचालकांना खाद्यपदार्थांचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 15:19 IST2019-08-10T15:09:37+5:302019-08-10T15:19:32+5:30
कोल्हापूर , सांगलीला महापुरामुळे पुर्ण वेढा घातला आहे. अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. याठिकाणी आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पुणे सातारा महामार्गावरुन सांगली , कोल्हापूर कडे जाणारी अवजड वाहने खबरदारीचा उपाय म्हणून थांबली आहेत

पुणे - बंगळुरु महामार्गावर अडकलेल्या वाहनचालकांना खाद्यपदार्थांचे वाटप
पुणे : कोल्हापूर , सांगली , सातारा या भागातील पूरग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी आणि मदतीसाठी अनेक हात सरसावले आहेत. मात्र याठिकाणी आलेल्या महापुरामुळे पुणे - बंगळुरू महामार्गावर अडकून पडलेल्या अवजड वाहन चालकांचे अन्न पाण्या वाचून हाल होत आहेत असे निदर्शनास येताच धनकवडी मधील अखिल जानुबाई दहिहंडी उत्सव ट्रस्ट ,राजगड तोरणा प्रतिष्ठान, स्थानिक नागरिक पोलीस आधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येत शिरवळ ते सातारा पर्यत महामार्गालगत उभे असलेल्या सर्व ट्रक चालकांना सुके खाद्यपदार्ख, अल्पोपहार व पिण्याचे पाणी यांचे वाटप केले.
कोल्हापूर , सांगलीला महापुरामुळे पुर्ण वेढा घातला आहे. अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. याठिकाणी आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पुणे सातारा महामार्गावरुन सांगली , कोल्हापूर कडे जाणारी अवजड वाहने खबरदारीचा उपाय म्हणून थांबली आहेत. त्यामुळे शिरवळपासून साताऱ्यापर्यंत जवळपास तीन ते चार हजार अवजड वाहने मार्गावर अडकून पडली आहेत. गाडीच्या चाका बरोबर फिरता संसार असलेल्या या ट्रक चालकांनी पहिले दोन दिवस जवळ असलेले खाद्यपदार्थ गाडीत असलेल्या स्टोवर शिजवून आपली भूक भागविली. मात्र जवळचा शिदा संपला आणि महामार्गावर अडकून पडल्यामुळे गाडी बाहेर काढता येत नाही आणि गाडी ही सोडून जाता येत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे या ट्रक चालकांची मोठी कुचंबणा झाली. नुसत्या पाण्याबरोबर भात खाण्याची वेळ काहींच्या वर आली तर काहींना उपाशापोटीच राहवे लागले. पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू असताना या ट्रक चालकांकडे दुर्लक्ष होत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर धनकवडी मधील सामाजिक संस्था व कार्यकर्तांनी एकत्र येत मदत करण्याचे ठरविले.