तिसरे अपत्य असणाऱ्या खासदार- आमदारांना अपात्र करावे : अजित पवारांची केंद्राकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 16:45 IST2023-04-23T16:44:41+5:302023-04-23T16:45:03+5:30
आपल्या लोकसंख्येचा आकडा आज १४२ कोटीपर्यंत पोहोचला असून याला आपणच जबाबदार आहोत. ही गोष्ट सर्वांनी गांभीर्याने घ्यावी

तिसरे अपत्य असणाऱ्या खासदार- आमदारांना अपात्र करावे : अजित पवारांची केंद्राकडे मागणी
बारामती: आज देशाची लोकसंख्या १४२ कोटीच्या पुढे गेली आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आम्ही तिसरे आपत्य जन्माला घालणाऱ्या व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवण्यास आपात्र केले होते. हा निर्णय आम्ही घाबरत-घाबरत घेतला होता. मात्र यावर लोक आम्हाला म्हणतात खासदार आमदारांना या नियमानुसार तुम्ही अपात्र का केले नाही. मात्र हा अधिकार आमच्या हातात नसून तो केंद्र सरकारच्या हातात आहे. केंद्राने याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
बारामती येथे एका खासगी कार्यक्रमा दरम्यान रविवारी (दि. २३) विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, आज १४२ कोटी इथपर्यंत आपल्या लोकसंख्येचा आकडा पोहोचला आहे. याला आपणच जबाबदार आहोत. ही गोष्ट सर्वांनी गांभीर्याने घेतली पाहिजे. कोणत्याही जातीने धर्माने पंथाने ही देवाची कृपा आहे असं समजू नये. हे कशाची देवाची कृपा? असा उपरोधिक सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. एक किंवा दोन अपत्त्यावर आपण थांबले पाहिजे. त्याशिवाय आपल्या देशाचे, राज्याचे भले होणार नाही. इथून पुढे दोन पेक्षा जास्त अपत्य जन्माला घालणाºयांना कसलीही सवलत द्यायची नाही.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आम्ही घाबरत घाबरत तिसरे अपत्य झाल्यानंतर ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास अशांना अपात्र केले. सहकार क्षेत्रामध्ये देखील अशा लोकांना अपात्र केले. त्यावेळी लोक आम्हाला म्हणतात खासदार आमदारांना या नियमानुसार तुम्ही अपात्र का केले नाही. मात्र हा अधिकार आमच्या हातात नसून तो केंद्र सरकारच्या हातात आहे. केंद्राने याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी आहे. जास्त अपत्य जन्माला घालणाºयांना कसल्याही प्रकारच्या सवलती दिल्या गेल्या नाहीत तर कुठेतरी जनता जागृत होईल. ज्यांना निवडणुकीला उभे राहायचे असते ते बरोबर दोन अपत्यांवर थांबतात. तिसºया आपत्याबाबत निर्णय घेताना आम्ही मार्ग काढला. पहिल्या बाळंतपणा वेळेस एक अपत्य झाले आणि दुसºया बाळंतपणा वेळेस जर जुळे जन्माला आले, तरी यामध्ये आई-वडिलांचा दोष नाही. हा विषय मी कॅबिनेट मीटिंगमध्ये मांडला होता. दुसºया बाळंतपणात जर जुळे, तिळे झाले तर तिथेच थांबायचे. तसेच पहिल्या बाळंतपणा वेळेस जर जुळे आणि तळे झाले तर मात्र दुसरे बाळंतपण होऊ द्यायचे नाही. पहिल्या बाळंतपणा वेळेसच थांबायचे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.