जेजुरी: पुरंदर तालुक्यातील जेजुरीपोलिस स्टेशन हद्दीतील आंबळेजवळील जगताप वस्तीवर शेतातील विहिरीच्या पाण्याच्या पाळीवरून वाद होऊन एका शेतकऱ्याचा चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली असल्याचे जेजुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी सांगितले.
अविनाश मल्हारी जगताप (वय ४०) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर बाळूदास काळूराम जगताप (वय ५५ रा. आंबळे, ता. पुरंदर, जि. पुणे) यास जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे. जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आंबळे हद्दीतील जगताप वस्ती येथे अविनाश मल्हारी जगताप यांची गट क्रमांक ८४८ मध्ये शेतजमीन आहे. शनिवार दि. १५ रोजी सकाळी पाऊने नऊ वाजण्याच्या सुमारास या शेतीतील विहिरीमधील पाण्याच्या पाळीवरून वाद होऊन आरोपी काळूदास याने खिशातील चाकू काढून अविनाश जगताप यांच्यावर चार ते पाच वार केले. या हल्ल्यात अविनाश जगताप यांचा मृत्यू झाला तसेच यावेळी या ठिकाणी उपस्थित असणारे अविनाश जगताप यांचे वडील मल्हारी जगताप, गणेश जगताप यांच्यावर आरोपीने चाकूने वार करून दोघांना गंभीर जखमी केले. अशी फिर्याद सौरभ दत्तात्रय जगताप यांनी जेजुरी पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच तातडीने जेजुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, महेश पाटील, पोलिस हवालदार दशरथ बनसोडे, विठ्ठल कदम यांनी घटनास्थळी जाऊन पळून जाण्याचा तयारीत असणाऱ्या आरोपीला जेरबंद केले. जेजुरी पोलिसांनी आरोपी बाळूदास जगताप यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सपोनि दीपक वाकचौरे तपास करीत आहेत.