सरकारमधील भांडणे, नाराजीचा आला उबग; बहुमत मिळाले तर कामाला लागा, सुप्रिया सुळेंचा टोला
By राजू इनामदार | Updated: January 21, 2025 16:34 IST2025-01-21T16:33:07+5:302025-01-21T16:34:13+5:30
जनतेने बहुमताने निवडून दिले तरीही ते आधी मुख्यमंत्री निवड, त्यानंतर मंत्रीमंडळ निवड, मग खात्यांची निवड व आता पालकमंत्र्यांची निवड यावरून भांडतायेत

सरकारमधील भांडणे, नाराजीचा आला उबग; बहुमत मिळाले तर कामाला लागा, सुप्रिया सुळेंचा टोला
पुणे: या सरकारमधील भांडणे, नाराजी, मतभेद ऐकूनऐकून उबग आला आहे. इतके मोठे बहुमत जनतेने दिले आहे तर अशा गोष्टी सोडून कामाला लागा. त्यांना मला लोकांनी सेवा करण्यासाठी निवडून दिले आहे, तू तू मै मै करण्यासाठी नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला लगावला. देशातील हे राज्य सरकार घटनेत नसलेली पदे निर्माण करण्यात पहिला क्रमांक मिळवणारे आहे असे त्या म्हणाल्या.
पुण्यात पत्रकारांबरोबर बोलताना पवार यांनी सरकारवर बरेच ताशेरे जोडले. मुख्यमंत्री दावोस ला आहेत, ते आले की त्यांची भेट घेणार व त्यांना शेतकरी, महागाई, बेरोजगारी यावर तुम्ही काम करणार आहात की नाही अशी विचारणा त्यांना करणार आहे असे त्यांनी सांगितले. राज्यातील जनतेने त्यांना फार मोठे बहुमत दिले. तरीही ते आधी मुख्यमंत्री निवड, त्यानंतर मंत्रीमंडळ निवड, मग खात्यांची निवड व आता पालकमंत्र्यांची निवड यावरून भांडत आहेत. दोन महिने होत आले अजून सरकार कामाला लागायला तयार नाही. या सगळ्याचा उबग आला आहे, लोकांनी धोरण ठरवण्यासाठी, देशाची सेवा करण्यासाठी निवडून दिले आहे, ना की भांडणांसाठी, सरकारनेच आता मागील दोन महिन्यात कोणते धोरण ठरवले, काय निर्णय घेतला याची माहिती द्यावी असे सुळे म्हणाल्या.
या सरकारने मागील सरकारची एक निविदा रद्द केली. त्यांचेच त्यावेळी होते, मग त्यांना निविदा का रद्द करावी लागली? याची चौकशी करावी लागेल. हार्वेस्टर मध्ये शेतकऱ्यांचे पैसे कोणी खाल्ले? याचीही विचारणा मुख्यमंत्ऱ्यांकडे करणार आहे असे सुळे यांनी सांगितले. बीड चे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांना जबाबदारी दिली, आता तिथली स्थिती सुधारेल का? या प्रश्नावर त्यांनी , प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायला हवी असे नाही. काही दिवस वाट तर बघू असे उत्तर दिले.