वीर धरणातून ६ हजार ११८ क्युसेक वेगाने नीरा नदी पात्रात विसर्ग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 15:07 IST2022-07-15T14:42:19+5:302022-07-15T15:07:28+5:30
वीर धरण ९० टक्के भरले...

वीर धरणातून ६ हजार ११८ क्युसेक वेगाने नीरा नदी पात्रात विसर्ग सुरू
नीरा (पुणे) : नीरा नदीच्या धरण साखळीत पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे पुरंदर व खंडाळा तालुक्याची सीमा असलेल्या नीरा नदीवरील वीर धरण ९० टक्के भरले असून शुक्रवारी (दि. १५) दुपारी दोन वाजल्यापासून नीरा नदीपत्रात ६ हजार ११८ क्युसेक्सने विसर्ग सुरु झाला आहे.
शुक्रवारी सकाळी आकरा वाजल्यापासून वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातून १ हजार ४०० क्युसेक व डावा कालवा विद्युतगृहातून ३०० क्युसेकने असे नीरा नदीपात्रात १ हजार ७०० क्युसेक वेगाने पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात येत होते.
त्यानंतर धरणसाखळीत पावसाचा जोर वाढता राहिला परिणामी धरणातील पाणीपातळी वाढत गेली. वीर धरणाच्या सांडव्यातून दुपारी २ वाजता ४ हजार ४१८ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता नीरा नदीपात्रात एकून ६ हजार ११८ क्युसेकने विसर्ग सुरु झाला आहे.
पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी. नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. असा सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.