पुणे : लोकसभा, त्यानंतर विधानसभेतही काँग्रेसचा दारूण पराभव झाला, मात्र पक्षाच्या राज्य किंवा केंद्रीय शाखेनेही या पराभवाला जबाबदार कोण याची साधी चौकशीही केलेली नाही. त्यामुळेच आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनच जाहीरपणे रोष व्यक्त होऊ लागला आहे. राहुल प्रियंका सेना नावाच्या संघटनेने तर काँग्रेसची शहर समितीच बरखास्त करा, अशी मागणीच गुरुवारी जाहीरपणे केली.
पत्रकार परिषदेत बोलताना संघटनेचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी सांगितले की लोकसभेला राज्यात सगळीकडेच काँग्रेस व काँग्रेसप्रमुख घटक असलेल्या महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले, पुण्यात मात्र पराभव झाला. विधानसभेला तर पोटनिवडणुकीत मिळालेली कसबा विधानसभेची एकमेव जागाही गेली. कॅन्टोन्मेट व शिवाजीनगर या दोन मतदारसंघाबाबत काही आशा होती, मात्र गटबाजीतून ती संधीसुद्धा गेली. दोन्ही जागांवर पराभव झाला. विसर्जित महापालिकेचे २९ नगरसेवक होते, त्यांचेही मागील महापालिका निवडणुकीत अवघे ९ झाले. आता तर अनेक प्रभागांमध्ये पक्षाला उमेदवार मिळणेही मुश्कील होईल. याचे कारण म्हणजे पक्षाची संघटना म्हणून पुण्यात काहीच शिल्लक राहिलेले नाही. शहर समितीमध्येच गटबाजी आहे. त्यामुळे ही कमिटी बरखास्त करणे गरजेचे आहे.
धीवर यांनी सांगितले की पुण्यातील पक्षाचे नेतृत्व कुचकामी ठरत आहे. या कमिटीला मतदारांसमोर कसलाही प्रभाव निर्माण करता आलेला नाही. पक्षाचे कार्यक्रम, पक्षाची आंदोलने यात कमिटीचे काहीही योगदान नाही. या सर्व गोष्टींमुळे पुण्यात पक्षाच्या प्रभावाचा खेळखंडोबा झाला आहे. कमिटी बरखास्त करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर ते चांगले काम करून पक्षाला पुन्हा उर्जितावस्था आणतील. ही मागणी पक्षाच्या राज्यातील तसेच दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाकडेही करणार असल्याचे धीवर यांनी सांगितले.
दरम्यान काँग्रेसच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्येही पक्षाने पुण्यातील पराभवाची, सतत ढासळत असलेल्या राजकीय शक्तीची दखल घेतली नाही याची खंत असल्याचे दिसते. स्पष्टपणे कोणी बोलत नसले तरीही पक्षाच्या अधोगतीला पुण्यातील नेतेच जबाबदार असल्याचे बहुसंख्य कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी आता पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणेच थांबवले आहे. नेत्यांमधील गटबाजीमुळे काहीजणांनी पक्ष कार्यालयात येणे बंद केले आहे. विधानसभेला राज्यात पक्षाचा दारूण पराभव झाला, जुन्याजाणत्या नेत्यांचाही पराभव झाला, तरीही केंद्रीय नेतृत्वाने त्याचा ठपका कोणावर ठेवला नाही, तोच प्रकार पुणे शहराच्या बाबतीतही नेते अवलंबत असल्याची कार्यकर्त्यांची भावना झाली आहे.