पैशांच्या हव्यासाने गर्भवतीचा बळी ? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर महिला आयोगाचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 14:21 IST2025-04-04T14:20:03+5:302025-04-04T14:21:04+5:30
पैशांच्या हव्यासापोटी रुग्णालयाने घेतला गर्भवतीचा बळी

पैशांच्या हव्यासाने गर्भवतीचा बळी ? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर महिला आयोगाचा संताप
पुणे : शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका गर्भवती महिलेला जीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐनवेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेला. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांवर मातृछत्र गमावण्याची वेळ आली नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलतांना संताप व्यक्त केला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केलेला हलगर्जीपणा, योग्य उपचार न दिल्याने २ जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त यांना या प्रकरणी तथ्य तपासून योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे आणि आयोगास वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
नेमकं काय घडलं ?
प्रसूती वेदना तीव्र झाल्याने महिलेला खासगी गाडीने २५ किलोमीटर अंतरावरील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली. तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र, त्या रुग्णालयात दाखल करताच तिचा मृत्यू झाला.
अधिक माहितीनुसार, भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली उर्फ ईश्वरी उर्फ तनिषा भिसे यांना प्रसूती वेदना होत होत्या. सुशांत यांनी पत्नीला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेले. त्यावेळी त्यांच्याकडे १० लाखांची मागणी करण्यात आली. त्यावर अडीच लाख रुपये आता तातडीने भरतो. उपचार सुरू करा, अशी विनंती सुशांत यांनी केली. पण, रुग्णालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. यात गर्भवतीची तब्बेत खालावली आणि त्यातच जीव गेला.
दरम्यान, काही मंत्री, आमदार यांनीही रुग्णालय प्रशासनाला फोन केले. परंतु प्रशासन काेणाचे ऐकले नाही. प्रसूती वेदना वाढल्याने नाईलाजाने सुशांत यांनी वाकड येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये तनिषा यांना नेण्याचा निर्णय घेतला. मात्र तातडीने ॲम्ब्युलन्सही उपलब्ध झाली नाही. शेवटी खासगी गाडीनेच त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांची सिझेरियनद्वारे प्रसूती झाली. तनिषा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलविण्यास सांगण्यात आले. त्यानुसार जवळच्या मणिपाल रुग्णालयात तनिषा यांना दाखल करण्यात आले. तोपर्यंत फार उशीर झाला होता. योग्य उपचार न मिळाल्यामुळे तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गर्भवतीचे पती सुशांत भिसे यांनी केला आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांसह पुणे शहर हादरून गेले आहे.
गर्भवतीची शारीरिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. नातेवाइकांकडून खोटे व चुकीचे आरोप केले जात आहेत. त्या संदर्भातील अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर केला आहे. मीडियात सध्या ज्या बातम्या येत आहेत त्या अर्धवट आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे
- डॉ. धनंजय केळकर, संचालक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय