'...त्यांची चौकशी प्रशासकीय आका कशी करणार?', मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, अध्यक्ष पवारांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 13:54 IST2025-04-06T13:52:03+5:302025-04-06T13:54:31+5:30
Deenanath Mangeshkar Hospital case: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेप्रकरणी सरकारने चौकशी समिती नेमली आहे. पण, समितीच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

'...त्यांची चौकशी प्रशासकीय आका कशी करणार?', मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, अध्यक्ष पवारांवर गंभीर आरोप
Devendra Fadnavis Deenanath Mangeshkar Hospital Case News: 'दीनानाथ मंगेशकर रुग्णालय म्हणजे एक आकाच आहे आणि त्याची चौकशी एक प्रशासकीय आका कशी करू शकणार?', असा सवाल करत राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष राम बोरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. बोरकर यांनी राधाकिशन पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखल करू घेण्यास नकार दिला. १० लाख रुपये जमा करण्यास सांगितल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने चौकशी समिती नेमली आहे.
हेही वाचा >>‘ही’ रुग्णालयाची मोठी चूक..! चौकशी समितीच्या अहवालात ‘दीनानाथ’वर ठपका
आरोग्य विभागाचे उपसंचालक राधाकिशन पवार हे या चौकशीचे समितीचे अध्यक्ष आहेत. पण, त्यांना समितीतून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष बोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात त्यांच्याबद्दल गंभीर आरोप केले आहेत.
मनसे नेते बोरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात काय?
"पुणे शहरात नुकतेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती भगिनीस बाळांतपणा दरम्यान उपचार न मिळाल्याने या भगिनीचा दीनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे बळी गेलेला आहे. या विषयास दीनानाथ रुग्णालय प्रशासनावर राज्य शासनाने चौकशी समिती नेमलेली आहे. या चौकशी समितीचे अध्यक्ष आरोग्य विभागाचे उपसंचालक राधाकिशन पवार हे आहेत."
"महोदय राधाकिशन पवार या दोषी व्यक्तीने दोषी असलेल्या धर्मादाय दीनानाथ रुग्णालय प्रशासनाची चौकशी करू नये. धर्मादाय दीनानाथ रुग्णालयामध्ये बाळंतपणासाठी आलेल्या तनिषा सुशांत भिसे या भगिनीचा रुग्णालयाने सांगितलेली आगाऊ पैसे न भरल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने दुर्दैवी बळी घेतला आहे."
दोषीच दोषीची चौकशी काय करणार?
"परंतु समितीमध्ये असलेल्या राधाकिसन पवार यांच्यावर अनेक वेळा त्यांच्या शासकीय कामात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याबाबत त्याच्यावर विधानसभेत आरोप ठेवण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर असलेल्या आरोपांबाबत विधानसभेतही लक्षवेधी घेऊन फक्त चर्चाच झालेली आहे. राधाकिशन पवार हे दोषी असूनही त्यांच्यावर बडतफीची कारवाई अपेक्षित असताना, अशी दोषी व्यक्ती दोषी धर्मादाय दीनानाथ रुग्णालयाची काय चौकशी करणार?"
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय म्हणजे एक आका
"या चौकशीतून सत्य बाहेर पडेल यात शंका वाटते. अशा प्रकारची चौकशी म्हणचे गुन्हेगाराची चौकशी गुन्हेगाराने करायची असे होते. हे आम्ही सहन करणार नाही. धर्मादाय दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल म्हणजे एक आकाच आणि त्यांची चौकशी एक प्रशासकीय आका म्हणजे राधाकिशन पवार हे कसे करू शकणार?"
"शासनाला पीडित भिसे परिवाराला खरंच न्याय द्यायचाच असेल, तर राधाकिशन पवार यांना चौकशी समितीमधून ताबडतोब काढून टाकावे अन्यथा भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीला आम्ही जबाबदार राहणार नाही. हे आम्ही शासनास सांगू इच्छितो", असे या पत्रात म्हटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रावर जागरूक पुणेकर समितीचे दिलीप सिंग विश्वकर्मा, रुग्ण सेवा फाऊंडेशनचे प्रवीण ठोंबरे यांच्यासह इतरांच्याही स्वाक्षऱ्या आहेत.