धर्मवीर वाद खोटा, ही भाजप - RSS ची चाल, पुरावे असतील तर जाहीर चर्चा करा - संभाजी ब्रिगेड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 04:51 PM2023-01-03T16:51:15+5:302023-01-03T16:51:29+5:30

छत्रपती संभाजी महाराज 'स्वराज्य रक्षक' होते याबद्दल पुराव्यानिशी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र समोर मांडायला तयार आहे

Dharamveer controversy is false this is BJP RSS ploy if there is evidence discuss it publicly - Sambhaji Brigade | धर्मवीर वाद खोटा, ही भाजप - RSS ची चाल, पुरावे असतील तर जाहीर चर्चा करा - संभाजी ब्रिगेड

धर्मवीर वाद खोटा, ही भाजप - RSS ची चाल, पुरावे असतील तर जाहीर चर्चा करा - संभाजी ब्रिगेड

googlenewsNext

पुणे : छत्रपती संभाजी महाराज 'स्वराज्य रक्षक' होते याबद्दल पुराव्यानिशी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र समोर मांडायला तयार आहे. ज्यांना कुणाला वाटतं (भाजप, RSS) छत्रपती संभाजी महाराज 'धर्मवीर' आहे. त्यांनी संभाजी ब्रिगेडचे आव्हान स्वीकारावं व जाहीर इतिहासातील वादावर 'परिसंवादाला' तयार व्हावं. तुमच्यात दम असेल तर पुरावे द्या. अन्यथा महाराष्ट्राची माफी मागा अशी स्पष्ट भूमिका पुण्यातून संभाजी ब्रिगेडने पत्रकार परिषदेत मांडली आहे.

छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते हे आम्ही पंचवीस वर्षापासून सांगत आलेलो आहोत. छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या बुधभूषण ग्रंथ साहित्यातून स्वराज्य धर्म, मराठा धर्म व महाराष्ट्र धर्म सांगितला. त्यांनी कुठेही 'धर्मवीर' किंवा स्वतःच्या धर्माबद्दल लिखाण केलं नाही. कारण 'छत्रपती' हे सर्व धर्माचा आदर करणारे अद्वितीय रयतेचे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा संभाजी महाराज यांनी सक्षमपणे पुढे चालवला होता.

तथाकथित धर्ममार्तंडांनी छत्रपती संभाजी महाराजांचा आयुष्यभर छळ केला. संभाजी महाराजांना ज्यांनी पकडून दिलं, ज्यांनी शंभूराजेंना मारलं हेच आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा संभाजीराजे यांच्या नावावर त्यांच्या विचारांचा छळ करत आहेत. आजही पाठ्यपुस्तकात, कथा, कादंबऱ्या, नाटकातून छत्रपती संभाजी महाराजांना बदफैली, दारुडे असं ठरवून बदनाम केलं जात आहे. आरएसएसच्या भट्टीतले तथाकथित साहित्यिक लेखक आणि विचारवंत हे वारंवार शिवद्रोही भूमिका घेत आलेले आहेत. म्हणूनच खोटा इतिहास मांडला जात आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण, सात-सतक, नाईका भेद व नखशिक हे चार ग्रंथ लिहिले. त्यांना आठ भाषा येत होत्या, ते संस्कृत पंडित होते. मात्र हे कधीही कोणीही कुठेही सांगितलेलं नाही असेही संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले आहेत. यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, सचिव संदीप कारेकर, लेखक नवनाथ रेपे, महादेव मातेरे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Dharamveer controversy is false this is BJP RSS ploy if there is evidence discuss it publicly - Sambhaji Brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.