जेजुरीतील कऱ्हा नदीवर भाविकांचे सोन्याचे ११ तोळ्याचे दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:19 IST2025-06-10T11:19:32+5:302025-06-10T11:19:46+5:30

भुकन आपली चारचाकी गाडी घेऊन पहाटे साडेपाचच्या सुमारास जेजुरीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नाझरे धरणाच्या पात्रात कऱ्हा स्नानासाठी गेले होते.

Devotees' gold ornaments worth 11 tolas were washed away on the Karha river in Jejuri | जेजुरीतील कऱ्हा नदीवर भाविकांचे सोन्याचे ११ तोळ्याचे दागिने लंपास

जेजुरीतील कऱ्हा नदीवर भाविकांचे सोन्याचे ११ तोळ्याचे दागिने लंपास

जेजुरी : श्रीक्षेत्र जेजुरी येथील कऱ्हा नदीवर असलेल्या नाझरे धरणाच्या पात्रात स्नानासाठी गेलेल्या भाविकांचे चोरट्याने सुमारे साडेचार लाख रुपयांचे ११ तोळे दागिने लंपास केले. याबाबत बाबासाहेब लक्ष्मण भुकन (रा. कासार पिंपळगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली आहे.

जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब भुकन हे आपल्या परिवारासह श्रीक्षेत्र जेजुरी येथे खंडोबा देवाची यात्रा करण्यासाठी आले होते. जेजुरी येथे खंडोबाच्या यात्रेसाठी आल्यावर कऱ्हा स्नान करणे पवित्र मानले जाते. भुकन आपली चारचाकी गाडी घेऊन पहाटे साडेपाचच्या सुमारास जेजुरीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नाझरे धरणाच्या पात्रात कऱ्हा स्नानासाठी गेले होते. त्याठिकाणी गाडी उभी करून गाडीतील नऊ जण नदीच्या पात्रात जाऊन स्नान करू लागले.

याचवेळी बाबासाहेब यांनीही आपली पॅन्ट काढून नदीच्या कडेला ठेवली. त्यांच्यातील एका मुलाला कपड्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. त्यानंतर तेही स्नान करण्यासाठी नदीपात्रात उतरले. सर्वजण स्नान करून आल्यावर त्याठिकाणी पॅन्ट न दिसल्याने सर्वांनाच धक्का बसला. कारण त्या पँटच्या खिशात सर्व महिलांचे दागिने काढून ठेवले होते. पण अज्ञाताने मुलाची नजर चुकवून पॅन्ट पळवून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली. पोलिस हवालदार मुजावर व पवार अधिक तपास करत आहेत.

Web Title: Devotees' gold ornaments worth 11 tolas were washed away on the Karha river in Jejuri