देवेंद्र फडणवीस यांना अजूनही पराभव पचवता आला नाही : अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 13:24 IST2020-02-17T13:17:56+5:302020-02-17T13:24:13+5:30
भारतीय जनता पार्टी व देवेंद्र फडणवीस यांना अजूनही पराभव पचवता आला नसून आजही फडणवीस यांना आपण मुख्यमंत्री होणार अशी सप्ने पडत आहेत असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पुण्यात लगावला.

देवेंद्र फडणवीस यांना अजूनही पराभव पचवता आला नाही : अशोक चव्हाण
पुणे :‘‘महाविकास आघाडीचे हे सरकार शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बरोबरीनेच काँग्रेसच्याही पाठिंब्यामुळे आले आहे. मात्र भारतीय जनता पार्टी व देवेंद्र फडणवीस यांना अजूनही पराभव पचवता आला नसून आजही फडणवीस यांना आपण मुख्यमंत्री होणार अशी सप्ने पडत आहेत असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पुण्यात लगावला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर व सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यानंतर पहिल्यादांच चव्हाण पुणे शहरामध्ये आले होते. यावेळी काँग्रेस भवनमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे ते म्हणाले की, 'भाजपने देशामध्ये एन.आर.सी. व सी.ए.ए.च्या माध्यमातून जाती धर्मांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये काँग्रेस पक्ष मुस्लिम धर्माची बाजू घेत आहे असे चित्र निर्माण करीत आहे. परंतु काँग्रेस पक्ष हा हिंदू - मुस्लिम, दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे काम करतो. भाजपच्या या जातीयवादी भूमिकेच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाड्या वस्त्यांमध्ये जावून त्यांची भूमिका सर्वांपर्यंत पोहचविण्याची आवश्यकता आहे.’’काँग्रेसच्या कार्यकर्त्याला गेल्या ५ वर्षामध्ये सरकारी यंत्रणेकडून जो काही त्रास झाला याची जाणीव देखील मला आहे त्यामुळे मी आज तुम्हाला हे नक्की सांगेन काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागून देणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की,'लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले अशा सर्व सामान्य कार्यकर्त्याला महामंडळ व समित्यांमध्ये योग्य ते स्थान देवून त्यांचा सन्मान करावा'. माजी आमदार मोहन जोशी यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, रोहित टिळक, संजय बालगुडे, गटनेते अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.