Kasba By Election: गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी हजेरी लावूनही भाजपने बालेकिल्ला गमावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 14:33 IST2023-03-02T14:04:19+5:302023-03-02T14:33:17+5:30
तब्बल २८ वर्ष भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय झाला

Kasba By Election: गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी हजेरी लावूनही भाजपने बालेकिल्ला गमावला
पुणे : कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपनं सर्व ताकद पणाला लावली. गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पुण्यात हजेरी लावली होती. अर्ध मंत्रिमंडळ प्रचाराला आलं होतं. मात्र, त्याचा फारसा फायदा हेमंत रासनेंना झाल्याचं पोटनिवडणुकीत दिसलं नाही. तब्बल 30 वर्षांनी भाजपने पारंपारिक मतदारसंघ गमावला आहे.
संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ०४० मतांनी पराभव झाला. तब्बल 30 वर्ष भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय झाला. कसब्यात कमळ कोमजले आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा गुलाल उधळला.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात लढत झाली. या निवडणुकीसाठी ५०.०६ टक्के मतदान झाले होते. आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. सुरवातील पोस्टल मतदान मोजण्यात आले. त्यात धंगेकर यांनी मतामध्ये आघाडी घेतली. धंगेकर यांनी मतमोजणीच्या २० फेरी पुर्ण होईपर्यत ही आघाडी कायम ठेवली. रासने यांना ६१ हजार ७७१ मते तर धंगेकर यांना ७२ हजार ५९९ मते मिळली.
तीस वर्षानंतर इतिहास घडला
पुण्याचा कसबा मतदारसंघ काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी जिंकला आहे. लढत चुरशीची होतीच, पण ११ हजारांहून अधिक मताधिक्यासह धंगेकर निवडून आल्याने भाजपला जोरदार धक्का बसला आहे. १९९१ ची पोटनिवडणूक वगळता भाजपचेच या मतदारसंघावर प्राबल्य राहिले. गिरीश बापट पाच वेळा इथे आमदार होते. त्यांनतर मुक्ता टिळक या आमदार झाल्या होत्या.