तीस कोटींचा चुराडा करूनही उद्योगनगरीतील हवा प्रदूषितच
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: December 26, 2024 17:54 IST2024-12-26T17:54:39+5:302024-12-26T17:54:51+5:30
उपाययोजना फोल : अतिधोकादायक पातळी कायम

तीस कोटींचा चुराडा करूनही उद्योगनगरीतील हवा प्रदूषितच
ग्राऊंड रिपोर्ट : ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : शहरात वायुप्रदूषण तसेच, धुळीचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. शहराची हवा स्वच्छ करण्यासाठी महापालिकेकडून तब्बल ३० कोटींचा खर्च करून विविध उपाययोजना करीत नवनवे प्रयोग करण्यात येत आहेत; मात्र शहराची हवा अधूनमधून अतिधोकादायक पातळीवर पोहोचत असल्याचे प्रदूषण पातळी काही घटत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
शहरात प्युरिफिकेशन फाउंटनसाठी ३ कोटी ९० लाख, रस्ते साफसफाईच्या वाहनांसाठी १ कोटी ७५ लाख, फॉग कॅननच्या पाच वाहनांवर कोट्यवधी, तर मोशी कचरा डेपोतील यंत्रणेसाठी एक कोटीचा खर्च करण्यात आला आहे. या यंत्र आणि वाहनांचे संचलन करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. ठेकेदारावर २३ कोटींचा खर्च आहे. असा सुमारे तब्बल ३० कोटींचा खर्च महापालिका करीत आहे. इतका खर्च करूनही शहरातील हवा पूर्णपणे स्वच्छ झाल्याचे दिसत नाही. अधूनमधून हवेची पातळी अतिधोकादायक पातळीवर जाऊन पोहोचत आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास पिंपरी-चिंचवड शहर दिल्ली, मुंबई व पुणे या अतिप्रदूषित शहरांच्या पंक्तीत जाऊन बसेल, अशी भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
एअर प्युरिफिकेशन सिस्टीम
आकुर्डी चौक, चिंचवड स्टेशन चौक, पिंपरी चौक, नाशिक फाटा, भोसरी पूल व कस्पटेवस्ती चौक अशा सहा ठिकाणी एअर प्युरिफिकेशन सिस्टीम बसविण्यात आली आहे. सभोवतालची हवा स्वच्छ करण्यासाठी व हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो. यामुळे चौकातील ५० मीटर त्रिज्येमधील वायुप्रदूषण काढून टाकण्यास मदत होते. नऊ पातळ्यांवर गाळण्याची प्रक्रिया पद्धत वापरली जाते. सभोवतालच्या हवेचे ऑनलाइन निरीक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ड्राय मिस्ट बेस्ड फाउंटन सिस्टीम
ही यंत्रणा शहरात २३ ठिकाणी बसविण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे उच्चदाब पंप व विशेष नोजल वापरून धुके तयार करण्यात येतात. हवेतील धुलिकण जड बनवून कमी केले जातात. ते जमिनीवर खाली आणले जातात. त्यामुळे जवळच्या भागात कण उडण्यास प्रतिबंध होतो. हवेची आर्द्रता, तापमान कमी होते. वातावरण थंड राहण्यास मदत होते.
स्टेशनरी फॉग कॅनन
त्यासाठी पाच वाहने मोशी कचरा डेपो येथे कार्यान्वित करण्यात आली आहेत. धूळ व गंध नियंत्रणासाठी वॉटर मिस्ट टेक्नॉलॉजी अंतर्गत ती डिझाइन केली आहेत. ही वाहने हवेतील धूळ कमी करतात. पोर्टेबल असल्याने कोणत्याही ठिकाणी ही वाहने ओढून नेली जाऊ शकतात.
ट्रक मॉन्टेड फॉग कॅनन
शहरातील १८ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर या प्रकाराची पाच वाहने फिरवून हवेतील धूळ कमी केली जाते. वॉटर मिस्ट तंत्रज्ञान वापरून मोबाईल डस्ट सप्रेशन व्हेईकल म्हणून डिजाईन केलेले हे वाहन आहे. रस्त्यांवरील जंक्शन, इमारती पाडणे, कचराकुंड्यांच्या परिसरातील हवेतील धूळ नियंत्रित करण्यासाठी ही वाहने वापरली जातात.
रोड वॉशर सिस्टीम
शहरातील १८ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीचे रस्ते दोन वाहनांद्वारे जलद व प्रभावीपणे साफ केले जात आहेत. एका शिफ्टमध्ये ४० किलोमीटर अंतराचा रस्ता धुऊन घेतला जातो. रस्त्यांसोबत पुतळे व उपकरणे धुण्यास हे वाहन वापरले जाते. या वाहनांना किलोमीटरनुसार पैसे दिले जातात.
पिंपरी-चिंचवडमध्ये राहण्यास मोठी पसंती दिली जात आहे. लोकवस्ती वाढत असल्याने सर्वत्र गृहप्रकल्प उभे राहत आहेत. खासगी वाहनांची संख्याही वाढली आहे. बांधकामे व बेसुमार वाहनांमुळे शहरातील हवा खराब झाली आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून महापालिकेस वाहने तसेच, चौकाचौकांत लावण्यासाठी यंत्रे लावण्यात आली आहेत. - संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, महापालिका