पुणे: स्वारगेट एसटी स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला तपासासाठी शुक्रवारी (दि. ७) गुन्हे शाखेचे पथक त्याच्या गुनाट गावी घेऊन गेले होते. गाडे फरार झाल्यानंतर लपलेल्या ठिकाणी पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवीत त्याचा मोबाइल शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, शंभर एकर शेत धुंडाळून देखील गाडेचा मोबाइल मिळून आला नाही. त्याच्या घराची झडती घेत पोलिसांनी सहा जणांचे जबाब देखील नोंदवले. सात ते आठ अधिकारी आणि अंमलदार असा ४० ते ४५ जणांचा ताफा गुनाट गावात दाखल झाला होता.
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास स्वारगेट पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे सोमवारी वर्ग करण्यात आला होता. यानंतर तपासाला वेगाने सुरुवात झाली आहे. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळगावे यांचे पथक तपास करत आहे. तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर गुरुवारी (दि. ६) गाडेची लष्कर पोलिस ठाण्यात पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, शैलेश संखे यांनी तब्बल तीन तास कसून चौकशी केली.
त्यानंतर तपासाची दिशा निर्धारित करण्यात आली होती. त्यानुसार गाडेला घेऊन शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक गुनाट गावात दाखल झाले. गुन्हा केल्यानंतर सर्व प्रथम गाडे कुठे गेला, कसा गेला, तो कुठे कुठे लपून बसला होता. त्याला लपण्यासाठी कोणी मदत केली का? याचा तपास गुन्हे शाखा करत आहे. गुन्हे शाखेने गाडे गुनाट गावात लपलेल्या ठिकाणांची पाहणी केली. त्याचबरोबर त्याच्या मोबाइलचा शंभर एकराच्या शेतात दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत शोध घेतला. मात्र, मोबाइल मिळून आला नाही. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असलेल्या सहा व्यक्तींचा जबाब नोंदवला. फरार कालावधीत गाडेने पाणी मागितलेल्या, जेवण मागितलेल्या, त्याचबरोबर गॅरेजवाला अशा लोकांचा यामध्ये समावेश आहे. गुन्हे शाखेने गाडेच्या घराची झडती घेऊन पंचनामा केला. स्वारगेट एसटी स्थानकात २५ फेब्रुवारी रोजी पहाटे शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला. या प्रकरणात दत्तात्रय गाडे (३७, रा. गुनाट, शिरूर) याला अटक करण्यात आली असून, गाडेला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.