पाण्यासाठी वणवण; भीमा नदीचे पात्र कोरडे..खेडचा पश्चिम भागातील परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 16:32 IST2025-03-02T16:32:14+5:302025-03-02T16:32:36+5:30
कालवा समितीकडून आदिवासी भागावर पुन्हा अन्याय

पाण्यासाठी वणवण; भीमा नदीचे पात्र कोरडे..खेडचा पश्चिम भागातील परिस्थिती
- अयाज तांबोळी
डेहणे : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने परिसरातील आव्हाट, खरोशी, डेहणे, शेेंदुर्ली, वांजाळे, धुवोली, शिरगाव, टोकावडे या काठावरील गावांत जनावरांच्या तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरण्याची वेळ आली आहे. दरम्यान, भीमा नदीच्या काठावरील असलेल्या शेतातील हिरवीगार पिकेदेखील पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. काही करा, परंतु धरणाच्या उपलब्ध पाणीसाठ्यामधून पाणलोट क्षेत्रातील लोकांना त्यांच्या हक्काचे शिल्लक पाणी ठेवण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी करूनही पाणी सोडण्यात आले.
आदिवासी भाग दुष्काळाच्या छायेत असून, भीमा नदीच्या पाण्यावर दौंड व शिरूर या तालुक्यातील अनेक बंधारे भरून वाहत आहेत तर अनेक खासगी तळी भरून ठेवण्यात आली आहेत. चासकमान धरणावर शिरुर व दौंड तालुक्यातील शेती समृद्ध होत असताना ज्या लोकांनी या धरणासाठी जमीन दिली त्या पश्चिम भागातील गावे मात्र तहानलेली आहेत.
नदीची पाणीपातळी तळाला गेली असून, कृषिपंप नदीच्या मध्यावर असूनही नदी कोरडी ठणठणीत पडल्याने काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या परिसरातील उभी पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. काही ठिकाणी शिल्लक राहिलेल्या नदीचा खोलगट भाग (डोह)व झरे यामधून शेतकरी पाणी नेऊन पिके जगवण्याची धडपड करताना दिसून येत आहे. भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने या परिसरात शेतीच्या पाण्याबरोबरच जनावरांना तसेच पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एकामागोमाग एक आवर्तन चालू असल्याने नदीपात्रातील तळ उघडा पडला आहे. आवर्तन बंद करून शिल्लक साठा ठेवला असता तर या परिसरातील उर्वरित गावांची पाण्याची समस्या कमी होण्यास निश्चितच मदत झाली असती.
मागील काही दिवसांपूर्वी धरणातून आवर्तन सोडताना या भागातील शेतकऱ्यांचाही विचार करावा, अशी मागणी होत होती. परंतु, प्रशासन याकडे कायमच दुर्लक्ष करीत आले आहे. पाण्याअभावी या परिसरातील शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचीही समस्या गंभीर आहे. यापुढे तरी धरणातील पाणी सोडू नये, अशी मागणी येथील शेतकरीवर्ग तसेच ग्रामस्थ करीत आहेत. आदिवासी भागातील गावांमधील पशुधन जगवणे अतिशय कठीण झाले असून, पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न दुग्धउत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे.
रब्बी हंगाम वाया
गेल्या तीन वर्षांपासून या गावांतील रब्बी हंगाम पाण्याअभावी वाया गेला आहे. दरवर्षी या भागात मुबलक प्रमाणात पाऊस पडत असतो. परंतु पाणी अडविण्याचे नियोजन नसल्याने शेतीबरोबर पिण्याचे पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे पशुधन कसे जगवायचे, हा प्रश्न पडला आहे. भीमा नदीपात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक राहिला नाही. पावसाला अजून तीन ते साडेतीन महिने वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे विहिरी, कूपनलिका इत्यादी पाण्याचे स्रोत आटून जाणार आहेत. या परिसरातील गावे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी निकषात बसत नसल्याने अनेक गावे व वाड्या-वस्त्या तहानलेल्या असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
भूमिगत बंधारे कागदावरच
पश्चिम भागातील आदिवासी भागात आव्हाट ते टोकावडे या परिसरात भीमा नदीवर किमान नऊ ठिकाणी बंधारे बांधता येऊ शकतात. कृष्णा खोरे लवादाच्या नियमांतर्गत हे काम होऊ शकते. त्यासाठी प्रस्ताव दिला असल्याचे अनेक वर्षे सांगितले जात आहे. बंधाऱ्यांचे उद्घाटन काही वेळा करण्यात आले. परंतु, एकही बंधारा होऊ शकला नाही, हक्काचे पाणी व पाणी टंचाईपासून मुक्तता हवी असेल तर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांसाठी जनमताचा रेटा हवा. अशा प्रकारच्या बंधाऱ्यांना जमीन लागणार नाही, धरणांतर्गत काम होणार असल्याने त्यामुळं कुणीही विस्थापित होण्याची शक्यता नाही. राजकीय इच्छाशक्ती मात्र हवी.
खेडच्या पश्चिम आदिवासी भागात भरपूर पाऊस पडूनही या भागात फेब्रुवारी ते जून या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. शासन दरबारी मंजूर बंधारे अनेकदा प्रयत्न करूनही शेवटच्या क्षणी होऊ शकले नाहीत. मागील काळात पावसाचे प्रमाण थोडे जास्त होते. परंतु, दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे यासाठी भीमा नदीवर कोल्हापूर टाइपचे बंधारे होणे अत्यंत गरजेचे आहेत. तरच पुढील काळात दुष्काळाला सामोरे जाता येईल. -ॲड. सुरेश कौदरे, अध्यक्ष, भीमाशंकर संस्थान.