पुणे : पौड (ता. मुळशी) येथील नागेश्वर मंदिरातील देवीच्या मूर्तीची विटंबना केल्याचा दुर्दैवी प्रकार घडला असून या घटनेनंतर दोन व्यक्तींवरती पौड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तरी हा सर्व प्रकार शुक्रवारी 2 मे रोजी दुपारच्या सुमारास घडला असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने गाव बंदची हाक देण्यात आली. या दुर्दैवी घटने बाबत शिवाजी मारुती वाघवले (वय 34) यांनी पौड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असता त्यांच्या तक्रारीनुसार चांद नौषाद शेख (वय 19) आणि नौषाद शादाब शेख (वय 44) यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या घटनेबाबत पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद नौषाद शेख याने मंदिरात प्रवेश करून मंदिराचे गेट बंद केले. त्यानंतर त्याने अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला खाली पाडून मूर्तीची विटंबना केली. ही संपूर्ण घटना सी. सी. टी.व्ही. कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असुन या घटनेनंतर आरोपी चांद नौषाद शेख (वय 19) आणि नौषाद शादाब शेख (वय 44) यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखता मंदिर व मशीदला पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास हा पौड चे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे व त्यांचे इतर सहकारी करीत आहेत.
या दुर्घटनेनंतर या ठिकाणी कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये. यासाठी पुणे मुख्यालयातील अतिरिक्त पोलीस पथक तसेच हवेली विभागातील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर मुळशी तालुक्यातील मुख्य चौकामध्ये नाकाबंदी करण्यात आली. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काही गावांमधील मुख्य मंदिरे व मज्जिद या ठिकाणी चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. हे कृत्य उघड होताच नागरिकांनी संबंधित आरोपीला चोप दिला त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांच्या वतीने संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत त्याला कोर्टा समोर हजर केले. या घटनेनंतर ग्रामस्थांच्या वतीने निदर्शने करीत पौड येथे शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर हा मोर्चा पौड पोलीस स्टेशनं येथे आल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने पौड पोलिसांना निवेदन देण्यात आले. यामध्ये संबंधित आरोपीला संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.