पुणे रेल्वे स्टेशनजवळ महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेसचे आंदोलन, पुतळ्याला दुग्धाभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 12:13 IST2025-07-07T12:12:52+5:302025-07-07T12:13:32+5:30

रात्रीच्या सुमारास हातात धारदार कोयता घेऊन केशरी रंगाचा कुर्ता परिधान केलेल्या शुक्लाने पुतळ्याची विटंबना केली

Desecration of Mahatma Gandhi's statue near Pune railway station; Congress protests, anoints statue with milk | पुणे रेल्वे स्टेशनजवळ महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेसचे आंदोलन, पुतळ्याला दुग्धाभिषेक

पुणे रेल्वे स्टेशनजवळ महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेसचे आंदोलन, पुतळ्याला दुग्धाभिषेक

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर रविवारी रात्री एक धक्कादायक प्रकार घडला. सुरज शुक्ला नावाच्या एका तरुणाने हातात कोयता घेऊन पुतळ्यावर थेट हल्ला चढवला. या प्रकारामुळे रेल्वे स्थानक परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. स्टेशनजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यामोर काँगेसने आंदोलन केले आहे. तसेच पुतळ्याला दुग्धाभिषेकही करण्यात आला आहे. 

शुक्लाने केशरी कपडे परिधान करून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली. त्यामुळे अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. पोलिसांकडून याबाबत सखोल तपास सुरु आहे. काँगेसनेही या घटनेची कसून चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर पुणे रेल्वे स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काँग्रेस पक्षाने या घटनेचा तीव्र निषेध करत आंदोलन केले. त्यानंतर गांधीजींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला.  

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास हातात धारदार कोयता घेऊन केशरी रंगाचा कुर्ता परिधान केलेला एक तरुण रेल्वे स्थानकाच्या बाहेर आला. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जाऊन तो चौथऱ्यावर चढला आणि पुतळ्यावर कोयत्याने वार करू लागला.

छाती आणि पायावर कोयत्याने वार

सुरज शुक्लाने पुतळ्याच्या छातीवर आणि पायावर कोयत्याने जोरदार वार केले. यावेळी उपस्थित प्रवाशांनी घडलेला प्रकार पाहून तत्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सुरज शुक्लाला चौथऱ्यावरून खाली उतरवून ताब्यात घेतले. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे पुतळ्याच्या डोक्यावर होणारा संभाव्य हल्ला टळला.

कोण आहे सुरज शुक्ला?

प्राथमिक माहितीनुसार, सुरज शुक्ला हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून काही काळापासून तो नोकरीच्या शोधात पुण्यात आला होता. त्याने हे कृत्य नेमके कोणत्या हेतूने केले, किंवा तो कोणत्या संघटनेशी संबंधित आहे का, याचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत. त्याच्याशी संबंधित काही ठोस माहिती मिळवण्यासाठी सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

 पोलिसांकडून तपास सुरू

सुरज शुक्लाच्या मानसिक स्थितीबाबतही तपास केला जात आहे. त्याने हे कृत्य आधीपासून नियोजित केले होते का, की अचानक मानसिक असंतुलनातून हे कृत्य घडले, याचा शोध घेतला जात आहे. रेल्वे पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना पसरली आहे.

Web Title: Desecration of Mahatma Gandhi's statue near Pune railway station; Congress protests, anoints statue with milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.