पोलीस उपनिरीक्षक ५० हजार स्विकारताना लाचलुचपत विभागाच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 13:39 IST2020-01-13T13:34:43+5:302020-01-13T13:39:29+5:30
अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची केली मागणी..

पोलीस उपनिरीक्षक ५० हजार स्विकारताना लाचलुचपत विभागाच्या ताब्यात
बारामती : अटकपूर्व जामीन प्रकरणात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्विकारताना बारामती तालुका पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहेत. बाळासाहेब जाधव असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.त्याच्यासोबत पोलीस शिपाई अजिंक्य कदम यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी (दि. १२) रात्री उशिरा कारवाई केली. या कारवाईमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब भीमराव जाधव (वय ५४, मूळ रा. पंढरपूर) व अजिंक्य लहू कदम यांनी ही रक्कम स्विकारली.
तक्रारदाराच्या भावाविरोधात तालुका पोलिस ठाण्यात दाखल प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी बाळासाहेब जाधव व अजिंक्य कदम यांनी केली होती. यातील ५० हजारांची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांना रंगेहाथ अटक केली. बारामतीतील नेवसे रस्त्यावर हॉटेल ओमसमोर पैसे स्विकारताना त्यांना पकडण्यात आले. एसीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, उपअधीक्षक श्रीहरी
पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक ज्योती पाटील, सुनील क्षीरसागर यांच्यासह पोलिस कर्मचारी दीपक टिळेकर व गणेश भापकर यांनी ही कारवाई केली. एसीबीने कारवाई केलेल्या बाळासाहेब जाधव यांची मागील आठवड्यातच जेजुरी पोलिस ठाण्यात बदली झाली होती. शनिवारी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. परंतु पैशाची हाव कायम राहिल्याने ते एसीबीच्या जाळ्यात अडकले.
——————————————————