मुख्यमंत्र्यांकडून जाणीवपूर्वक अपमान, उपोषणासाठी जास्त दिवसांची परवानगी द्यावीच लागेल - जरांगे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 20:30 IST2025-08-28T20:28:40+5:302025-08-28T20:30:26+5:30
"मराठा समाजाचा अंत पाहू नका. उपोषणासाठी जास्त दिवसांची परवानगी द्यावीच लागेल," असा इशारा त्यांनी सरकारला दिला

मुख्यमंत्र्यांकडून जाणीवपूर्वक अपमान, उपोषणासाठी जास्त दिवसांची परवानगी द्यावीच लागेल - जरांगे पाटील
नारायणगाव : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे यांनी नारायणगाव येथे मराठा समाजाच्या सभेत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. फडणवीस यांनी मराठा समाजाचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोप करत, जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणासाठी फक्त एका दिवसाची परवानगी देण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. "मराठा समाजाचा अंत पाहू नका. उपोषणासाठी जास्त दिवसांची परवानगी द्यावीच लागेल," असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक झाल्यानंतर नारायणगाव येथे आयोजित सभेत जरांगे यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मी आझाद मैदानावर उपोषण करणार आहे. पण सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे. माझ्या मराठी युवकाला जर आंदोलनादरम्यान काठीचा एक फटकाही लागला, तर त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल,’ असा कडक इशारा त्यांनी दिला.
जरांगे यांनी नारायणगावातील सभेतील गर्दी ही आतापर्यंतच्या आंदोलनातील सर्वात मोठी गर्दी असल्याचे नमूद केले. "पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मला नेहमीच साथ दिली. आता मुंबईतील आंदोलन लांबलं, तरी पुणे जिल्ह्यातील मराठा समाज माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि मुंबईत शिद्दा पुरवेल," असे त्यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या उद्रेकाचे कारण सरकारचा टाळाटाळीचा दृष्टिकोन असल्याचे जरांगे यांनी अधोरेखित केले. "मराठा समाजाला संपवण्याचा डाव फडणवीस सरकारचा आहे. पण आम्ही हा अपमान सहन करणार नाही," असे त्यांनी ठणकावले. या सभेला मराठा समाजातील मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते, ज्यामुळे आंदोलनाला आणखी बळ मिळाल्याचे दिसून आले.